
छायाचित्र : पुसेगाव : भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ येथील श्री सेवागिरी महाराज आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने पुसेगावात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
येथील छत्रपती शिवाजी चौकातून सुरू झालेल्या तिरंगा रॅलीद्वारे देशभक्तीचे अनोखे दर्शन घडले. रॅलीत आजी-माजी सैनिक, लहान मुले, तरुण, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते तसेच ललगुण येथील लक्ष्य करिअर अकडमीच्या विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत अनेकांनी तिरंगा अंगावर परिधान केला होता, तर काहींनी फेटे बांधून सहभाग घेतला होता. सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी केलेला आकर्षक पेहराव लक्ष वेधून घेत होता
जुन्या पोस्ट ऑफिसमार्गे रथमार्गावरून श्री सेवागिरी मंदिर ते श्री भवानी माता मंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात आली. जागोजागी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी स्वागत केले.रॅलीदरम्यान, 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'जय जवान, जय किसान' अशा देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. देशभक्तीपर गीतांचेही यावेळी सादरीकरण झाले. रॅली दरम्यान, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, भारतीय सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांच्या साहसाचे कौतुक करण्यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटतो आहे. पुसेगाव व परिसरातील नागरिकांनी या तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रप्रेमाची जाणीव अधोरेखित केली आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, अशी भावना आजी-माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली.




Social Plugin