देऊळगाव राजा (प्रतिनिधी) मनोहर खंदारे
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या यात्रा समितीच्या सभेत, वार्षिक उत्सव व यात्रेच्या नियोजनाचा विस्तृत आढावा घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. यावेळी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी त्यांच्या प्रास्ताविकात, उत्सव कालावधीची तसेच आतापर्यंत झालेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. तसेच दुष्काळ परिस्थितीमुळे, व्यावसायिक, शेतकरी व यात्रेकरूंसाठी श्री बालाजी संस्थान व जागावाटप समिती राबवणार असणाऱ्या, सर्वांसाठी अत्यंत अल्पदरात भोजनकक्ष, गोशाळा व गाढव बाजारातील गाढवांसाठी चारावाटप, यात्रेकरूंसाठी पाणपोई तसेच बसस्टँड किंवा वाहनतळावरून यात्रेकरूंना मंदिरात जाण्यासाठी अल्पदरात इलेक्ट्रिक व्हेईकल, इत्यादी उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
यावेळी श्री सतीश कायंदे, नगराध्यक्षा माधुरी शिंपणे तसेच सर्व नगरसेवक, एसडीपीओ श्री ठोसरे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी, मुख्याधिकारी श्री मोकळ, विद्युत व परिवहन विभागाचे अधिकारी तसेच यात्रा समिती सदस्य व सर्व पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे, एकूण 18 मुद्द्यांवर चर्चा होऊन ठराव करण्यात आले. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस कंट्रोल रूम तसेच यात्रा मार्गदर्शन केंद्र, यासंदर्भात आणि यात्रेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले. व्यापाऱ्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा, भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था, मोफत आरोग्य सेवा, स्वच्छतागृहे आणि पथदिवे सुरू करण्यावर भर देण्यात आला. अतिरिक्त एसटी बसेस, लोकनाट्य मंडळास परवानगी, दररोज रात्री बारापर्यंत व्यावसायिकांना परवानगी तसेच उत्सवांच्या दिवशी सर्व दारू दुकाने बंद ठेवणे, या मुद्द्यांसह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
दुष्काळ परिस्थितीमुळे, व्यावसायिकांना यात्रेतील जागा मोफत वाटप करणेसंदर्भात तसेच त्याचा फायदा यात्रेकरूंना देण्यासंदर्भात, सर्वानुमते चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले.





Social Plugin