Ticker

6/recent/ticker-posts

जवान प्रसाद काळेच्या कुटुंबिय पुण्यात अभया पुरस्काराने सन्मानित...!



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] - 

काळेवाडी ता.खटाव भारतीय जवान प्रसाद काळे हा लग्नाची  हळद ओली असताना पूजेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कुटुंबियांचे व नववधूचा निरोप घेऊन देशसेवेसाठी ड्युटीवर हजर झाला होता.भावनिक न होता त्याच्या कुटुबियांनी व नववधू ने त्या जवानाला हसत देशसेवेसाठी निरोप दिला होता.या घटनेच्या बातम्या,तसेच सोशल मिडीयावर कौतुक झाले.काळे कुटुंबियांचे विविध स्तरातून अभिनंदन केले गेले.पुणे येथील वंचित विकास संस्थेनेही सामाजिक बांधीलकी जपत या जवानाची आई सौ.संगिता काळे व पत्नी सौ.वैष्णवी काळे यांचा पुणे येथे विशेष सत्कार करून त्यांना अभया पुरस्कार देत त्यांचा गौरव केला.

 पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी वंचित विकास संस्थेतर्फे एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना 'अभया सन्मान' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी ओल्या हळदीच्या अंगाने सीमेवर जाण्यासाठी हसतमुखाने निरोप देणाऱ्या भारतीय सैन्यदलातील प्रसाद काळे यांच्या पत्नी वैष्णवी प्रसाद काळे व त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या आई संगीता भरत काळे या दोघींचाही आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी 'ग्राम परिवर्तन प्रबोधिनी कटगुण, ता.खटाव यांच्या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली.

यावेळी वुमनिया पुणे या संस्थेच्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेंचा, संचालिका सुनीता जोगळेकर,मीना कुर्लेकर, मीनाक्षी नवले,देवयानी गोंगले,चैत्राली वाघ,तृप्ती फाटक आदी उपस्थित होत्या.


 वंचित विकास संस्थेचे आभार...

आम्ही सातारा जिल्ह्यातील असून ही पुणे येथील वंचित विकास संस्थेने सामाजिक बांधीलकी जपत आम्हाला अगत्यपूर्ण निमंत्रण देत आमचा विशेष सत्कार करत अभया सन्मान केला त्याबद्दल वंचित विकास संस्थेचे व पदाधिकारी,सदस्यांचे आम्ही आभार मानतो.

- सौ.संगिता भरत काळे, जवानाची आई,काळेवाडी ता.खटाव

छायाचित्र- पुणे येथे वंचित विकास संस्थेतर्फे अभया सन्मान स्विकारताना सौ.संगिता काळे व वैष्णवी काळे