Ticker

6/recent/ticker-posts

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भेट



अलिबाग(रत्नाकर पाटील)

देशातील अव्वल क्रमांकाची आणि सर्व अभिनव योजना पूर्ण करणारी रोल मॉडेल बँक म्हणून ज्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ओळखले जाते त्या बँकेला भेट द्यावी हे माझे सहकार क्षेत्रातील अभ्यासक या नात्याने एक स्वप्न होते आज ते स्वप्न पूर्ण झाले असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भेटीदरम्यान केले. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि विशेषता सहकाराला आधुनिक दिशा देण्याचे धाडस दाखविले हे अधिक कौतुकास्पद आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, तसेच बँकेचे सर्व संचालक व सहकार विभागाचे आणि बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात सहकार मंत्री यांनी सांगितले की, "लातूर येथून सहकारी चळवळीतून सुरु झालेला माझा प्रवास आज राज्याच्या सहकार खात्याच्या जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे, याकरिता रायगड जिल्हा सहकारी बँकेचे उदाहरण माझ्याकरिता अधिक प्रेरणादायी ठरणार आहे , आरबीआय ,नाबार्ड ,राज्य शासन यांच्यावतीने करण्यात येणारा प्रत्येक उपक्रम बँकेने यशस्वी करून दाखविला आहे, त्याकरिता बँकेचे धोरण आणि एकत्रित कार्यपद्धतीचा प्रभाव अधिक उल्लेखनीय आहे असे नमूद करताना बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि सर्व संचालकांचे कौतुक केले. परदेशात गेल्यावर जसा शिस्तबद्धतेचा आणि पारदर्शकतेचा अनुभव येतो, तसाच अनुभव रायगड बँकेमध्ये आला याबाबत बँकेतील शिस्त, स्वच्छता आणि नेतृत्वाची प्रामाणिकता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बँकेने देशात मिळवलेली ओळख आणि बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले कार्य हे आगामी अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, माझ्या विधिमंडळातील सुरुवातीच्या कालावधीत भाषण कसे करावे ,मुद्दे कसे मांडावे ह्या बाबत जयंत पाटील यांनीच मला प्रशिक्षण दिले होते त्याचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला शिवाय ग्रामीण सहकारी बँकांना येणाऱ्या अडचणी, अंमलबजावणीतील अडथळे यांविषयी शासन पातळीवर त्याचे लवकरच निराकरण होईल असे आश्वासनही दिले. 

या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात लातूर येथून सहकार मंत्री यांचा प्रवास व त्यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. राजकीय क्षेत्रातील सहकारमंत्र्यांचा प्रवास हा सहकारातून झालेला असल्याने राज्यातील सर्व सहकारी बँकांच्या भविष्यातील योजनांकडे शासनाने अधिक गंभीरतेने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा संक्षिप्त आढावा सादर केला.तसेच सहकार विभागाच्या मदतीने रायगड जिल्हा सहकारी बँकेने आपला देशातील पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे आणि त्या प्रगतीमध्ये सातत्य राखता आहे त्याबद्दल सहकार विभागाचे आभार  आपल्या भाषणात त्यांनी व्यक्त केले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी आभार प्रदर्शन केले तर सिनियर मॅनेजर संदीप जगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.