Ticker

6/recent/ticker-posts

आणीबाणी लागू करून संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न केला--चित्रा वाघ यांचा घणाघात



अलिबाग(रत्नाकर पाटील)

आणीबाणी लागू करून संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्याविरूध्द लढण्यासाठी लोक जेलमध्ये गेले. अत्याचार सहन केला. त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले. देशाचे संविधान धोक्यात आहे असे फेक नरेटीव्ह तयार केले जात आहे. लोकांची दिशाभूल केली जात असल्याची टीका  भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी केली.

देशातील आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे बुधवारी (दि. 25) आलिबाग येथे लोकशाही संरक्षणा दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्या बंदीवानांचा या समारंभात सत्कार करण्यात आला. या समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून चित्रा वाघ बोलत होत्या.

भाग्यलक्षी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडित पाटील,  रायगड लोकसभा संघटक सतीश धारप, दक्षिण  जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, गिरीश तुळपुळे,  डॉ. मंजुषा कुद्रीमोदी, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. निलीमा पाटील, पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, माजी तालुकाध्यक्ष उदय काठे,  तालुकाध्यक्ष अशोक वारगे,  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ज्यांनी भारतात आणीबाणी लादून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान पायदळी तुडवले त्या इंदिरा गांधी यांचे वंशज राहुल गांधी आज देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.  जे लढत आहेत त्यांना आणीबाणीत बंदिवास भोगलेल्यांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन चित्रा वाघ यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्या भाषणात आपले वडील स्व प्रभाकर पाटील यांनी आणीबाणीत दिलेल्या लढ्याच्या आठवणीना उजाळा दिला. या लढ्याची झळ आपण भोगली असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा डीएनए काँग्रेसच्या विरोधात आहे, आमची पहिली लढाई काँग्रेसविरोधात झाली असेही ते म्हणाले. यावेळी सतीश धारप यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.  आणीबाणीत जेल भोगलेल्या गिरीश तुळपुळे यांनी सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक करताना रायगड जिल्ह्यात दिलेला लढा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील अन्वित अत्याचाराची माहिती यावेळी तुळपुळे यांनी दिली.