Ticker

6/recent/ticker-posts

आरसीएफमधील अमोनियामुळे भातशेती धोक्यात

 


कंपनी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप


 अलिबाग (रत्नाकर पाटील)

युरिया खत निर्मिती करणाऱ्या आरसीएफ कंपनीमधील अमोनिया वायु गळतीमुळे बोरीस- गुंजीस परिसरातील भातशेती धोक्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून समस्या कायम आहे. मात्र, कंपनी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे. शेतांमधील भाताची रोपे पिवळी पडून पिकती दोनशे हेक्टरहून अधिक जमीन नष्ट होण्याचे संकट वाढले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष देण्यास कंपनी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

अलिबाग तालुक्यातील थळ येथे हजारो एकर क्षेत्रामध्ये खत निर्मिती करणारे आरसीएफ प्रकल्प 1984 मध्ये उभे राहिले. भात पिकांसह इतर पिकांच्या लागवडीला उभारी देण्यासाठी युरिया खताचे उत्पादन कंपनीकडून केले जाते. कृषी विभागाच्या मागणीनुसार युरिया खताचा पुरवठा कंपनी प्रशासन करीत आहे. परंतु, युरिया खताची निर्मिती करणाऱ्या आरसीएफ कंपनीमधील अमोनिया वायू गळतीमुळे बोरीससह गुंजीस परिसरातील भातशेती धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बोरीस – गुंजीस परिसरात तिनशेहून अधिक शेतकरी भात व इतर पिकांची लागवड करतात. भात शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, कंपनीच्या अमोनियामुळे उपासमारीची वेळ येण्याची भिती निर्माण झाली आहे.

आरसीएफ कंपनीच्या अमोनिया वायू गळतीमुळे मागील आठवड्यापासून भाताची रोपे पिवळी पडली आहेत. शेतीच्या होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत कंपनी प्रशासनाकडे लेखी पत्र देऊन समस्या सोडविण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे. परंतु, कंपनी प्रशासन बैठक लावण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप येथील काही शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ व्हावी, म्हणून आरसीएफ कंपनीमार्फत युरिया खताची निर्मिती केली जाते. खरिप हंगामात या खताला शेतकऱ्यांना प्रचंड मागणी असते. परंतु, याच कंपनीच्या अमोनिया वायू गळतीमुळे शेजारी असलेली शेत जमीन नापिक होत असल्याकडे कंपनी दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे. कंपनीच्या मनमानी कारभारामुळे बाजूच्या गावांतील शेतकरी उध्वस्त होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कंपनीच्या या वायु गळतीवर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

                                    शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

अमोनियामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत नवीनचंद्र राऊत, प्रकाश पडते, राजेंद्र पडते, अरविंद पडते, अमर म्हात्रे, सुभाष पडते, सुरेंद्र कटोर, शैलेश म्हात्रे, विनोद म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, सी.एस. म्हात्रे, नंदुकूमार घरत, निलेश पडते, संजय पडते, लक्ष्मण पाटील, हर्षल पडते आदी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे या प्रश्नाबाबत माहिती दिली. कंपनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, कंपनी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

                                  कृषी अधिकाऱ्यांची शेतावर भेट

अमोनिया वायू गळतीमुळे गुंजीस, बोरीस परिसरातील भात शेती पिवळी पडत आहे. पिकती जमीन संकटात आली आहे. ही बाब शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक संतोष टकळे यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट दिली. पिवळे पडलेल्या रोपांची पाहणी केली.

थळ येथे गेल्या 40 वर्षापासून आरसीएफ कारखाना आहे. युरिया खत निर्मिती करणारा हा कारखाना बाजूच्या गावांतील शेतकऱ्यांसाठी त्रासदायक व नुकसानकारक ठरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून अमोनिया वायु गळतीचे संकट बाजूच्या गावांतील भात शेतीसह अन्य फळ पिकांवर आहे. पिकती शेत जमीन नापिक होण्याची भिती निर्माण झाली आहे. कंपनीने याबाबत बैठक लावण्याबाबत नेक वेळा मागणी केली आहे. परंतु, कंपनी प्रशासन सहकार्य करीत नाही. बैठक लावण्यास टाळाटाळ करीत आहे.-प्रकाश पडते शेतकरी

बोरीस गुंजीस येथील भात शेती आमोनिया वायू गळतीमुळे पिवळी पडली की नाही, याची पाहणी कृषी तज्ञांद्वारे केली जाणार आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी अजूनपर्यंत प्रस्ताव प्राप्त झाला नाही. दरवर्षी एक लाख 40 हजार भाताची रोपे तसेच 800हून अधिक फळ पिकांची रोपे देण्याचे काम कंपनी प्रशासनाने केले आहे. यावर्षीदेखील रोपे देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पावसामुळे नुकसान झाले आहे. पुन्हा पेरणी करून भाताची रोपे देण्याचा प्रयत्न राहणार आहे. -राकेश कवळे,जनसंपर्क अधिकारी, आरसीएफ कंपनी, थळ

बोरीस, गुंजीस येथील भात शेती अमोनिया वायू गळतीमुळे पिवळी पडली आहे. शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. ही बाब शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यांनी गुरुवारी तज्ज्ञांमार्फत पाहणी केली जाईल, असे आश्वासन दिले.-सदिच्छा पाटील सरपंच