शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव)
– भक्तीरसात न्हालेलं वातावरण, विठ्ठलनामाचा जयघोष, अभिषेक, आरती, हरिपाठ, भजने, आणि कीर्तनाचा सुरेल संगम... अशा भक्तिमय वातावरणात शिरुर शहरात रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी देवशयनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी होणार आहे.या विशेष दिवशी ध्यान मंदिर, विठ्ठलनगर, शिरुर यांच्या वतीने भव्य आणि दिव्य "विठ्ठल नामाचा गजर" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण शहर भक्तिरसात चिंब होणार आहे.
सकाळी ६:०० वा. – श्री विठ्ठल-रुक्मिणींचा महाअभिषेक
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६:०० वाजता होणार असून, श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींना महाअभिषेक करण्यात येणार आहे. हा पवित्र अभिषेक जि.प. सदस्य मा. मंगलदास बांदल व जि.प. सदस्या रेखा मंगलदास बांदल यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सकाळी ८:०० वा. – महाआरतीचा तेजोमय सोहळा
यानंतर सकाळी ८:०० वाजता, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे व माजी सरपंच विठ्ठल घावटे (शिरुर ग्रामीण) यांच्या शुभहस्ते महाआरती होईल. विठ्ठलनामाच्या गजरात आरतीचा सोहळा मंत्रमुग्ध करणारा ठरणार आहे.
दुपारी ३ ते ६ वा. – हरिपाठ व संगीतभजनाचा कार्यक्रम
दुपारी ३:०० ते ६:०० या वेळेत ध्यान मंदिर हरिपाठ भजनी मंडळ, विठ्ठलनगर यांच्यातर्फे सुरेल भजने, हरिपाठ आणि विठ्ठलनामाचा अखंड जप सादर होणार आहे. शहरातील अनेक मान्यवर कीर्तनकार आणि गायक यात सहभाग घेणार असून, हा कार्यक्रम शहरवासीयांसाठी एक अध्यात्मिक मेजवानी ठरणार आहे.
सायं. ६:०० ते ७:०० – हरिपाठ
परंपरेनुसार सायंकाळी ६:०० ते ७:०० या वेळेत हरिपाठाचा कार्यक्रम पार पडणार आहे, ज्यात विविध भजन मंडळे, वारकरी मंडळांचे सहभागीपण अपेक्षित आहे.
सायं. ७:०० – प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाआरती
सायं. ७:०० वाजता, सहआयुक्त संजीव पलांडे (विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे) आणि शिरुर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या शुभहस्ते भव्य महाआरती होईल. या प्रसंगी शहरातील मान्यवर अधिकारी, नागरिक, महिला, युवती आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सायं. ७:१५ वा. – ह.भ.प. जनाबाई गायकवाड यांचे हृदयस्पर्शी कीर्तन
आरतीनंतर सायं. ७:१५ वाजता सुप्रसिद्ध प्रवचनीन ह.भ.प. जनाबाई गायकवाड यांचे विठ्ठल महिमा आणि संत परंपरेवर आधारीत कीर्तन सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या ओघवत्या वाणीने श्रोते मंत्रमुग्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे आयोजक व आवाहन
या संपूर्ण भक्तिपर्वाचे आयोजन श्री संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठान, ध्यान मंदिर व्यवस्थापन समिती, विठ्ठलनगर, शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, यासाठी अतिशय नियोजनपूर्वक तयारी सुरू आहे.
श्री संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण बनकर यांनी शिरुर शहरातील सर्व भाविक भक्तांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, विठ्ठल नामात रंगावे आणि अध्यात्मिक अनुभूती घ्यावी.
"नाम घेता पांडुरंगाचा, पावन होती जीवन यात्रा" – चला, या आषाढी एकादशीला विठ्ठलनामात रंगूया!
Social Plugin