Ticker

6/recent/ticker-posts

जनगणना ही देशाच्या भविष्याशी निगडित : शशिकांत जाधव



              डी.जी. कॉलेज मध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष व्याख्यान 

 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील महसूल विभागाचे तहसीलदार शशिकांत जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यावसायिक अर्थशास्त्र  विभागप्रमुख डॉ. विजय कुंभार यांनी करताना लोकसंख्या वाढीच्या समस्यांचा आणि त्यातील संधींचा आढावा घेतला. त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

शशिकांत जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात जनगणनेच्या प्रक्रियेचे सविस्तर आणि माहितीपूर्ण विवेचन केले. त्यांनी जनगणना ही देशाच्या भविष्याशी निगडित एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. जनगणनेमध्ये नागरिकांनी वय, जात, धर्म यासारखी खरी व अचूक माहिती देणे अत्यावश्यक असून, ही माहितीच पुढील शासकीय धोरणांची आखणी ठरवते. यंदाची जनगणना ही पूर्णतः डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, प्रक्रियेच्या प्रारंभी घरांची मोजणी केली जाते आणि त्यानंतर व्यक्तींची माहिती संकलित केली जाते. या प्रक्रियेत घरातील वस्तू जसे की दुचाकी, चारचाकी, टी.व्ही. इत्यादींचीही नोंद घेतली जाते. बालक, स्त्रिया, वयोवृद्ध, विविध वयोगटांतील व्यक्ती तसेच सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीची माहिती अचूकरीत्या संकलित करणेही महत्त्वाचे असते. या माध्यमातून देशातील भाषा आणि बोलीभाषांची मोजणीदेखील केली जाते. ही जनगणना एक महाकाय प्रक्रिया असून, त्यात सुमारे २.५ लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. या आकडेवारीचा उपयोग देशाची समग्र विकास योजना व विकास आराखडे तयार करणे, ग्रामविकास योजना, शहरी विकस योजना, शैक्षणिक धोरणे, आरोग्य सेवा, संसाधनांचे वितरण अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केला जातो. जनगणना म्हणजे केवळ संख्या मोजणी नसून, ती देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचे प्रतिबिंब असते, असे त्यांनी नमूद केले.

देशाची लोकसंख्या ही देशाची संपत्ती असून लोकसंख्येचा विधायक वापर करून देशाचा आर्थिक विकास साध्य केल्यास देशाचे प्रगती जलद गतीने होऊ शकेल तसेच देशातील आर्थिक विषमता व वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक केल्यास आर्थिक व सामाजिक प्रगती साध्य होऊ शकेल असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. गणेश जाधव यांनी व्यक्त केले. बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजशेखर निल्लोलू यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी  व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागप्रमुख डॉ. विजय कुंभार, विभागातील प्राध्यापक डॉ. विजय पाटील, प्रा. भाग्यश्री भोसले, प्रा. साझिया हुसेन, प्रा. प्राजक्ता कुंभार, प्रा. निकिता जाधव, प्रा. रोहिणी धाईंजे,  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.