अलिबाग(रत्नाकर पाटील)
पेझारी येथील कोएसो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारोती भगत यांनी इंग्रजी विषयाच्या विविध जागतिक स्पर्धेत सहभाग घेऊन सुयश संपादन केलेले आहे. स्पेन मधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याचे संबंधित संस्थेने त्यांना कळविले आहे . स्पेन मधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करीत असते, या संस्थेचे जगभरात ४०००० फॉलोअर्स असून त्यांच्याकरिता ही संस्था अशा स्पर्धा आयोजित करीत असते, यापैकी इंग्लिश टीचर नावाची इंग्रजी भाषे संबंधाची स्पर्धा जागतिक पातळीवर गेल्या ११ आठवड्यापासून सुरू होती , १५ जून ते २१ जून या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये प्राचार्य मारोती भगत यांनी सहभाग नोंदवून ७६७९ गुण प्राप्त करून त्यांनी प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे.
फिलिपाईन्स येथील टीचर जी या संस्थेने अशीच इंग्रजी विषयाची स्पर्धा त्यांच्या एक लक्ष फॉलोअर्स साठी आयोजित केलेली होती त्यामध्ये प्राचार्य मारोती भगत यांनी २४७६ गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे, तसेच जॉर्डन मधील जॉर्डन इंग्लिश ग्रुप या संस्थेने त्यांच्या ८९९७६ फॉलोअर्स साठी इंग्लिश लिंबो ही इंग्रजी भाषे करिता स्पर्धा आयोजित केलेली होती, या ऑनलाइन स्पर्धेत ४१२६ गुण मिळवून प्राचार्य मारोती भगत यांनी दुसरा क्रमांक संपादन केलेला आहे . वास्तविक प्राचार्य मारोती भगत यांचा मूळ इंग्रजी विषय नाही, त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या इंग्रजी विषयाचा व्यासंग वाढवत नेऊन इंग्रजी विषयांच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपला इंग्रजी विषयाचा व्यासंग जागतिक पातळीवर सिद्ध केला त्यामुळे त्यांचे परिसरातील राजकीय, सामाजिक मान्यवर , अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
Social Plugin