Ticker

6/recent/ticker-posts

एकत्र येतील युती होईल पण चुका कोण सुधारणार?



 बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]  

  संयुक्त महाराष्ट्राची चळवळी नंतर मराठी माणूस अनेक पक्षांमध्ये विखुरला गेला होता मराठी माणसाचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र झाल्यानंतर मराठी माणसाला एकत्र आणणारे अशी कुठलीही संघटना नव्हती त्यामुळे साठच्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नामक संघटना उभी करून मराठी माणूस पुन्हा एकदा एकत्र करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या प्रयत्नाला यशही भरपूर प्रमाणात आले.सुरुवातीला मराठीच्या मुद्द्यावर लढणारी शिवसेना नव्वदच्या दशकात हिंदुत्वासाठी लढू लागली या सगळ्याचा परिपाक म्हणजे सन 1995  साली राज्यात पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला.रस्त्यावर लढणारी शिवसेना सत्तेवर आली आणि त्यानंतर सेनेतील अनेक नेत्यांना सत्तेची चव चाखता आली.नव्वदच्या दशकात बाळासाहेबांनंतर श्री राज ठाकरे यांच्याकडे त्यांचे वारसदार म्हणून बघितले जाऊ लागले;परंतु 1997 च्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने श्री उद्धव ठाकरे यांची राजकारणात इंट्री झाली.त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेतील ताकद वाढतच गेली याचाच परिपाक म्हणजे महाबळेश्वर येथील झालेल्या अधिवेशनात श्री उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर काहीच दिवसात राज ठाकरे यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष काढला.

  श्री राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर पहिल्या झटक्यात नाशिक महापालिकेत सत्ता मुंबईत 30 नगरसेवक व विधानसभेत 13 आमदार निवडून आणून आपली ताकद दाखवून दिली ; परंतु हीच ताकद त्यांना टिकवता आली नाही. नंतरच्या निवडणुकीत त्यांची ताकद घटतच गेली.मनसेच्या उदया नंतर शिवसेना संपते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती; परंतु उद्धव ठाकरे यांनी संघटन कौशल्य बांधून 2012 ची मुंबई व ठाणे महानगरपालिका जिंकून आपले नेतृत्व अबाधित ठेवले. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाण नंतर शिवसेना संपेल अशी बहुतेक लोकांची धारणा होती; कारण सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची एक हाती सत्ता आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपाने गेली 25 वर्षे असलेली युती तोडली. अशा अवघड परिस्थितीत ज्यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे श्री बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा नव्हता किंवा पंचवीस वर्षे असलेल्या मित्र पक्षाची साथ नव्हती तरी त्यावेळेस श्री उद्धव ठाकरेंनी एक हाती संघर्ष करून 63 आमदार निवडून आणले त्यामुळे शिवसेनेची महाराष्ट्रातील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली.सन 2019 च्या लोकसभा निवडणुका आधी पुन्हा एकदा शिवसेना-भाजपची युती झाली.लोकसभेतील घवघवीत यशानंतर भाजपाने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण करायला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षातील सत्तेत असूनही स्वीकारावी लागणारी दुय्यम भूमिका व निवडणुकीत होणारे सापन्न वागणूक यामुळे श्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाऊन महाविकास आघाडीचा घाट रचला; आणि तो यशस्वी करून दाखवला.परंतु त्यांच्याच पक्षातील श्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना पक्ष श्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चिन्हा सहित घेतला. इतके वर्ष शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाण व शिवसेना हे नाव श्री एकनाथ शिंदे यांना मिळाले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्री उद्धव ठाकरे हे नवीन पक्ष व चिन्ह या समवेत निवडणुकीला सामोरे गेले.परंतु लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश विधानसभा निवडणुकीत त्यांना टिकवता आले नाही.त्याचबरोबर श्री राज ठाकरे यांना सुरुवातीला मिळालेली यश पुढील काळात राखता आले नाही.2014 ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकच आमदार निवडून आला.नाशिक महापालिकेची सत्ताही गेली.परंतु राज ठाकरे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला पक्ष कायम चर्चेत ठेवला.

       सन 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर विरोधकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. दररोज एक नेता महायुतीत सामील होत आहे त्यामुळे विरोधकांच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिकेच्या निवडणूकीत परत एकदा सत्तेवर येण्यासाठी एकत्र येणे व युती करणे हे दोन्ही ठाकरे बंधू साठी क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले दोन्ही बंधू महानगरपालिकेच्या निवडणुकीत युती करून निवडणूक लढवतील व यश संपादन करतील अशी भावना महाराष्ट्रातील काही जाणकार लोक व दोन्ही ठाकरेंना मानणारे समर्थक मनोमनी मानतात; परंतु जरी हे दोन्ही बंधू एकत्र येऊन सत्ता स्थापन केली तरी ती किती दिवस टिकेल याची शाश्वती दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना नाही.

      कारण दोन्हीही बंधू नेहमी एका वेगळ्या जगात जगत असतात.श्री उद्धव ठाकरे तसे मवाळ नेतृत्व असे लोक म्हणतात. बाळासाहेबांच्या नंतर त्यांनी पक्षाची धुरा उत्कृष्टपणे बजावली आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी एखाद्या माणसावर विश्वास ठेवला त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात यामुळेच श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संघटनेतील सर्वाधिकार दिले होते.स्व पक्षातील चाळीस आमदार पक्षाचा मुख्यमंत्री असताना पक्ष सोडून जातात यावर श्री उद्धव ठाकरे यांनी विवेचन करावे. एवढी पडझड झाल्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे कमीत कमी 30-35 आमदार निवडून येतील अशी परिस्थिती होती; कारण श्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या सार्वभौमिक व कोरोना काळातील कामामुळे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते.कायम विरोधात मतदान करणारा मुस्लिम समाजाची उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी होता परंतु ठाकरे गटाला वीस आमदाराच्या वर जाता आले नाही. कारण महाविकास आघाडीतील पक्षांनी उद्धव ठाकरे यांना गोड बोलून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला.सातारा,पाटण,श्रीगोंदा बडनेरा या ठिकाणच्या उमेदवारां चे डिपॉझिट जप्त झाले; असे कमीत कमी दहा ते बारा मतदारसंघात घडले. खरंतर या ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेसचे ताकद असताना शिवसेनेला उमेदवारी देऊन 100 जागा मिळालेल्या ठाकरे गटाला सुरुवातीलाच दहा-बारा जागांची नुकसान झाले होते.बरं हे उद्धव ठाकरे यांना कसे काय दिसून आले नाही हे विशेष!!!! कारण ते महाराष्ट्राचे राजकारण गेली 30 वर्षे जवळ पाहत आहेत.का उद्धव ठाकरे यांना माहिती पुरवणारे नेतेच त्यांची दिशाभूल करत आहे याकडे एक पक्षाचा प्रमुख म्हणून श्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष दिले पाहिजे.विधानसभा निवडणुकीनंतर श्री उद्धव ठाकरे केव्हा आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्याचा दौरा केला किंवा पक्षातील आजी-माजी लोकांची बैठक घेतली असेही ऐकवात नाही. यासंबंधी त्यांनी श्री शरद पवार यांचे उदाहरण लक्षात घ्यायला पाहिजे.यश मिळो अथवा अपयश श्री शरद पवार हे कायम या वयातील जनतेत मिसळतात,त्यांची भावना जाणून घेतात. ह्या गोष्टीं उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या कडून शिकले तर त्यांचे यश कायम राहू शकते.

          श्री राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थापना केल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले परंतु पुढील निवडणुकीत त्यांना सातत्य टिकवता आले नाही.त्यांच्या भाषणाला भरपूर लोक जमतात परंतु त्यांचे मतात परिवर्तन होताना दिसून येत नाही यालाही ते जबाबदार आहेत. त्यांनी 2014 ला लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला तर पाच वर्षातच त्यांनी 2019 ला काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रचार केला.त्यांनी घेतलेल्या अनेक धरसोड वृत्तीमुळे लोकांच्या मनात ते चांगले वक्ता आहेत परंतु ऐनवेळी भूमिका बदलतात म्हणून लोक मतदान करत नाहीत अशी भावना निर्माण झाली आहे. ही भावना त्यांना नष्ट करायचे असेल तर त्यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येऊन पूर्ण ताकदीने निवडणूक लढवावी.व पुढील पाच वर्षे त्यांच्याबरोबरच राहिले तर त्यांच्या भूमिका बदलणाऱ्या गोष्टीला छेद बसू शकतो,व मराठीच्या मुद्द्यावर ते दोन्ही बंधू एकत्र नांदू शकतात असे आश्वासक चित्र महाराष्ट्रात पुढे उभे राहील. तसेच उत्कृष्ट वक्ता असलेले राज ठाकरे संघटन कौशल्यात कुठेतरी कमी पडताना दिसतात.सुरुवातीला प्रत्येक महानगरात भक्कम असणारी त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी गेल्या दहा वर्षात कुठेतरी इतर  पक्षात जाताना  दिसली आहे.त्यांनी त्यांची संघटना मजबूत बांधून परत एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. 

       शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची ताकद या देशांनी पहिली आहे आणि त्याच वलयात हे दोन्ही बंधू जगत असतात.श्री उद्धव ठाकरे यांना एखादा चुकीचा दिसला तर तो कायम चुकीचा दिसतो राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेणे हे उद्धव ठाकरे यांना मान्य नाही म्हणून तर राजकारणात त्यांचे कोणी मित्र नाही, त्याच्या उलट श्री राज ठाकरे यांचे राजकारणात भरपूर मित्र असूनही ऐनवेळी घेतलेल्या कचखाऊ भूमिका मुळे त्यांना यश भेटू शकले नाही.या दोन्ही गोष्टी इतर पक्षातील नेते जाणतात म्हणून तर या दोन्ही ठाकरे बद्दल तोंडावर गोड बोलून आपला कार्यभाग गोड करून घेतात या गोष्टी ठाकरे बंधूंना लवकर आकलण्यात आल्या, व त्यांनी योग्य बदल केल्यास त्यांचे यश कायम राहू शकते कारण ते दोघे कधीही हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाहीत.