बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने बँक राष्ट्रीयकरण दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वरिष्ठ बँक अधिकारी श्री. नंदकुमार पापरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. देशाच्या आर्थिक विकासात देशातील राष्ट्रीयकृत बँकांनी बजावलेली भूमिका व त्यांचे योगदान युवा पिढीला माहीत व्हावे व या राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रति तरुण वर्गात आदरभाव निर्माण व्हावा याकरिता बँक मॅनेजमेंट विभागातील सर्व विद्यार्थ्यांकरीता बँक राष्ट्रीयकरण दिनाच्या निमित्त राष्ट्रीयकृत बँकांचा आढावा घेण्याकरिता विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाने शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध अनुभव दिला आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या सामाजिक व आर्थिक योगदानाची सखोल जाणीव करून दिली.
देशाच्या सर्वांगीण विकासात राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून शेती, लघुउद्योग, ग्रामीण विकास, महिला सशक्तीकरण आणि वित्तीय समावेशन यासारख्या क्षेत्रांमध्ये या बँकांनी फार मोठी भूमिका बजावली असल्याचे श्री. पापरकर यांनी स्पष्ट केले, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरवतात. तसेच सिंचन, बी-बियाणे, ट्रॅक्टर आणि अन्य कृषी उपकरणांसाठी कर्ज उपलब्ध करून देतात. प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना आणि मुद्रा योजनेसारख्या शासकीय उपक्रमांतून ग्रामीण भागातील वित्तीय समावेशन आणि सक्षमीकरण साधण्यात या बँकांचा मोठा वाटा आहे. लघुउद्योग व ग्रामीण उद्योजकांसाठी दीर्घकालीन कर्ज, अनुदान, कौशल्यविकास प्रशिक्षण व आर्थिक सल्ला या माध्यमांतून आर्थिक सहाय्य देऊन रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण औद्योगिकीकरण या बँकांचे योगदान अमुल्य आहे. आज जरी खाजगी बँकांची संख्या आणि स्पर्धा वाढली असली, तरी राष्ट्रीयकृत बँका आजही सामान्य जनतेसाठी बँकिंगच्या विश्वासार्ह चेहऱ्याप्रमाणे कार्य करत आहेत. त्यांनी नफा-केंद्रित दृष्टिकोन न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत बँकिंग सेवा अधिक लोकाभिमुख केल्या आहेत.
आर्थिक विषमता कमी करणे, दुर्लक्षित घटकांपर्यंत सेवा पोहोचवणे ही त्यांची भूमिका आजही महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘ATM’, ‘नेट बँकिंग’, ‘UPI’ यांसारख्या आधुनिक सेवा प्रदान करताना त्यांनी डिजिटल व्यवहार अधिक सुलभ केले आहेत. मात्र, ग्रामीण भागात या सुविधा अधिक व्यापकपणे पोहोचवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. महिला सशक्तीकरण, वित्तीय साक्षरता, निर्यातप्रधान उद्योगांना वित्तपुरवठा, तसेच विविध शासकीय प्रकल्पांना बँकिंग सहाय्य देण्यातही राष्ट्रीयकृत बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून पाहता, या बँकांची भूमिका भविष्यात अधिक निर्णायक ठरणार असून, त्या आपल्या सामाजिक बांधिलकी आणि विश्वासार्हतेचा वारसा यापुढेही टिकवतील, असा विश्वास श्री. पापरकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाचे सर्व प्राध्यापक, डॉ. विजय पाटील, प्रा. भाग्यश्री भोसले, प्रा. साझिया हुसेन, प्रा. प्राजक्ता कुंभार, प्रा. निकिता जाधव, प्रा. रोहिणी धाईंजे, तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin