कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना : सामाजिक व आर्थिक आव्हानांवर मात करत जालना येथील रुपाली गणपत साळवे यांनी महाराष्ट्र महसूल विभागात तलाठी पदावर यशस्वीरीत्या नियुक्ती मिळवली आहे. लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (LOLT) च्या अनंदो प्लस उपक्रमातून शिक्षण घेतलेल्या रुपालीचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
२०१४ साली वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले. आईने किराणा दुकान चालवत आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले. नुतन वसाहत केंद्र, जालना येथून LOLT च्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या रुपालीने शिक्षणात सातत्याने उत्तम कामगिरी केली.
तीने इयत्ता १०वी मध्ये ७७% व १२वी मध्ये ७३% गुण प्राप्त केले. पुढे तिने राजकीय शास्त्रात एम.ए. पदवी घेतली. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनीला हे यश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
सध्या रुपाली साळवे यांची धुळे जिल्ह्यात तलाठी पदावर नियुक्ती झाली असून त्या सध्या शासन सेवेत कार्यरत आहेत. या पदावर त्यांना दरमहा ₹३९,००० इतके स्थिर उत्पन्न मिळत आहे. रुपालीच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचेच नव्हे, तर नुतन वसाहत परिसरातील व LOLT उपक्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले आहे. तिची जिद्द, चिकाटी आणि मेहनत यामुळे ती आज ग्रामीण भागातील मुलींसाठी आदर्श ठरत आहे. LOLT जालना टीमने तिचा विशेष सत्कार केला असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Social Plugin