Ticker

6/recent/ticker-posts

होमगार्डच्या नशिबी उपेक्षाच! तुटपुंजे मानधन, अनिश्चित काम अन् दुर्लक्षित भविष्य



नाशिक, प्रतिनिधि, अमन शेख 

पोलीस दलाला सहाय्य करण्यासह अंतर्गत सुरक्षा व बंदोबस्तासाठी नेहमीच झोकून देणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षी मानधनाचा काहीसा लाभ झाला असला तरी त्यांच्या समोर अनंत अडचणी व समस्यांचा डोंगर वाढताच आहे. मागील वर्षी राज्यात विभागवार झालेल्या तब्बल दहा हजार जागांवरील भरतीत नाशिक शहर आणि जिल्ह्याला अनुशेषानुसार २३२ नवे होमगार्डस् मिळाले असून अल्प मानधन, अपात्र प्रकरणांसह नोटिसा व वर्षभरातील पाच महिने कामच मिळत नसल्याने होमगार्ड भरतीकडे सध्याची तरुणाई दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कालानुरूप ‘होमगार्ड’च दुर्लक्षित होण्याची भीती आहे.

होतकरु तरुण होमगार्डच्या भरतीत प्राविण्य मिळवून प्रशिक्षण पूर्ण करताच गृहखात्यासह महासमादेशक कार्यालयाच्या सूचनेने जिल्हा व तालुका समादेशकांच्या आदेशाने गणेशोत्सव, आपातकालीन स्थिती, मोर्चा, राज्यस्तरीय बंदोबस्तासह तत्कालिन कारणांसाठी पोलिसांना सहाय्य म्हणून कर्तव्य बजावतात. ते करतांना त्यांना ठराविक दिवसाच्याच कामाचे मानधन मिळते. मात्र, ते फारच कमी असून शासनाने होमगार्डला वर्षभराचे कर्तव्य द्यावे. जेणेकरुन अनेक ठिकाणच्या अडचणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते, अशी मागणी होमगार्ड संघटनांनी केली आहे.

दरम्यान, विभागाकडून होमगार्डला योग्य वागणूक मिळत नसून अनेकांना अपात्र करण्यात आले आहे. जुने होमगार्ड काढूननव्यांना प्राधान्य दिले जात आहे, परंतु आजारी व किरकोळ रजा घेतली तरी अपात्र केले जात असल्याचा दावा काही होमगार्डसह संघटनांनी केला आहे. आजारपणासाठी रजेचा अर्ज दिल्यावरही जिल्हा रुग्णालयाचे प्रमाणपत्र मागितले जाते. त्याची पूर्तता करुनही अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांत नाशिकमध्ये गर्भवती होमगार्डला अपात्र ठरविण्यात आल्याचा दावा संघटनांनी केला असून विधानसभा निवडणूक बंदोबस्ताला गैरहजर, कवायतीला गैरहजर आदी कारणांतून जिल्हा व तालुका होमगार्ड कार्यालयाने सन २०२४-२५ मध्ये ४० हून अधिक जणांना अपात्रतेची कार्यवाही केल्याचे समजते. त्यावर महाराष्ट्र होमगार्ड विकास समितीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

या आहेत मागण्या

होमगार्ड सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्यात यावे.

अपात्र केलेल्यांना पुन्हा सामावून घ्यावे

आगामी सिंहस्थासाठी कार्यरत-सेवानिवृत्त होमगार्डची मदत घ्यावी.

बाहेरील फोर्सपेक्षा कार्यरत व निवृत्त होमगार्डला प्राधान्य द्यावे.

माजी गृहरक्षक महिला, दिवंगत होमगार्ड, निराधार महिलांना सात हजार रुपये मानधन मिळावे.

कुटुंबांना घरकुल मिळावे. 


दृष्टीक्षेपातून

आवश्यकता- २,३००कार्यरत-२,१०० (नवीन भरतीसह)रिक्त-२००मागील वर्षीचे मानधन-६७० रुपयेसुधारित मानधन-१, ३५० रुपयेजवानांच्या म्हणण्यानुसार मिळतात १, २८३ रुपयेहोमगार्ड जवानांना ट्रॅफिक वॉर्डनच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांसह नियुक्त करावे. यातून वाहतुकीची समस्या सुटेल व होमगार्डच्या कर्तव्यानुसार त्याला मानधन मिळेल. आता ३६५ दिवस काम मिळावे अशी मागणी असून सध्या १४० ते १५० दिवसांसाठीच बोलविले जाते व ते मानधन मिळते.