Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अलिबाग मध्ये सांगीतिक वारी : तीर्थ विठ्ठल



अलिबाग(रत्नाकर पाटील)

मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील आरसीएफ कुरूळ मध्ये शनिवार ५ जुलै रोजी सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत कलाकार सायली तळवलकर आणि नागेश आडगावकर यांचा ' तीर्थ विठ्ठल ' या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अलिबाग परिसरातील ज्येष्ठ भजनी बुवांचा सत्कार देखील कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे. 

मैफिल अलिबाग ही संस्था गेली ३५ वर्षे सातत्याने दर्जेदार सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या आयोजनामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्द कलाकारांच्या दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद  अलिबाग परिसरातील बहुसंख्य संगीत रसिक वर्षानुवर्षे घेत आहेत. यावर्षी झालेला दोन दिवसीय संगीत महोत्सव आणि  नंतर सुप्रसिद्ध जादूची पेटी या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित तीर्थ विठ्ठल या कार्यक्रमात सुविख्यात शास्त्रीय कलाकार सायली तळवलकर आणि नागेश आडगावकर लोकप्रिय भक्तिरचना सादर करणार आहेत. अलिबागमध्ये आजोळ असणाऱ्या सायलीने भारतीय शास्त्रीय संगीतातील एक आश्वासक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. उषा देशपांडे, पद्मा तळवलकर, आरती अंकलीकर यांसारख्या दिग्गज गुरूंकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेणारी सायली शास्त्रीय संगीत, ठुमरी, कजरी, चैती, होरी सारखे उपशास्त्रीय संगीत प्रकार आणि भजन, अभंग, नाट्यसंगीतासारख्या लोकप्रिय संगीतात देखील पारंगत आहे. या कार्यक्रमातील दुसरे कलाकार नागेश आडगावकर हे विख्यात शास्त्रीय गायक रशीद खान यांचे शिष्य असून सुरेल मोहक आवाजासाठी सर्वपरिचित आहेत. आपल्या संत परंपरेतील काही संतांच्या रचना तसेच दिग्गज कवींच्या लेखणीतून अजरामर झालेल्या भक्तिगीतांचा नजराणा तीर्थ विठ्ठल या कार्यक्रमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे.सर्व रचना विठुरायाला समर्पित असणार आहेत.सायली आणि नागेश या दोन गायक कलाकारांना साथ करण्यासाठी हार्मोनियमवर निरंजन लेले,तबल्यावर रोहन पंढरपूरकर,पखवाजवर सुशांत पाटील आणि टाळ वादनासाठी भालचंद्र शेळके असे अव्वल कलाकार आहेत. 

 ५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता आर सी एफ सभागृह,सरखेल कान्होजी आंग्रे वसाहत, कुरुळ अलिबाग या ठिकाणी संपन्न होणार असून हा कार्यक्रम विनामूल्य, सर्वांसाठी खुला आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील भजनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ गायक व वादक यांचा सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम मैफिलने या कार्यक्रमाच्या निमित्ताने योजिला आहे. अलिबाग परिसरातील संगीत रसिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.