Ticker

6/recent/ticker-posts

अखेर कुरुळ कॉलनीतील प्रवेश सुरू



                                शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

| अलिबाग | रत्नाकर पाटील |

कुरुळ येथील आरसीफ कर्मचारी वसाहतीमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केला होता. या प्रकारामुळे शेकापच्या वतीने चित्रलेखा पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. एक जूलैपर्यंत प्रशासनाला अल्टीमेटम देऊन मार्ग पुन्हा सुरू करा अशी  मागणी केली होती. अखेर कंपनी प्रशासनाने नागरिकांसाठी हा मार्ग अटी व नियम लावून सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे, स्थानिक दूचाकी वाहन चालकांसाठी केलेल्या नियमांच्या अटी शिथिल कराव्यात अशी शेकापच्या वतीने मागणी केली आणि प्रशासनाचे आभार मानले.

आरसीएफ कुरुळ येथील कॉलनीमधून ये - जा करतात. सुरक्षीत आणि सोयीचा मार्ग  पादचाऱ्यांसह चालकांना व स्थानिकांना ठरत आहे. मात्र हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाल्याचे चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास आले. शेकाप प्रवक्त्या, महाराष्ट्र राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्यासह तालुका चिटणीस यांनी  कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कॉलनीतून मार्ग पुर्ववत खूला करावा अशी मागणी ३० एप्रिल व २ मे ला निवेदनाद्वारे केली होती. अन्यथा शेकापच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता. आरसीएफ कंपनी स्थापन झाल्यापासून गेल्या अनेक वर्षापासून कुरुळ, वेश्वी, चेंढरे येथील प्रकल्पग्रस्त, शाळा, महाविद्यालयमधील विद्यार्थी, नोकरदार वर्ग आरसीएफ कुरुळ कॉलनीतून ये जा करत होते. सुरक्षीत आणि सोयीचा मार्ग म्हणून अनेकजण कॉलनीतून येण्या जाण्याचा मार्ग स्विकारत होते. मात्र गेल्या  दोन महिन्यापुर्वी कंपनी प्रशासनाने हा मार्ग स्थानिकांसाठी बंद केला. कॉलनीत प्रवेश बंद झाल्याने स्थानिकांची प्रचंड गैरसोय झाली होती.

स्थानिकांसह नागरिकांचा विचार करून बंद केलेला मार्ग पुर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह शेकाप महाराष्ट्र राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील पत्राद्वारे व प्रत्येक्ष भेट घेवून केली होती.  

कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा शुक्रवारी ( दि. 23 ) मे आरसीएफ थळ कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि आरसीएफ चेंबूर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यालयात भेट घेत मार्ग पुर्ववत सुरू करावा अशी मागणी केली. अन्यथा स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी शेकापच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. एक जूलैपर्यंत रस्ता खुला केला नाही, तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला होता. अखेर ३० जून रोजी वसाहतीमधून येण्या जाण्याचा मार्ग सूरू करण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षेच्या नियमांच्या आधीन राहून अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे. आरसीएफ कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना कंपनी प्रशासनाकडून ओळखपत्र दिले जाणार आहे. वसाहतीमध्ये प्रवेश केल्यावर सुरक्षा नियमांचे पालन करणे. शिस्त शांततेचे पालन होईल याची दक्षता बंधनकारक राहणार आहे. मात्र वसाहतीमध्ये कोणालाही वाहन घेऊन जाता येणार नाही हा मुद्दा चुकीचा आहे, आमची मागणी आहे येथून नेहमी ये-जा करणार्‍या स्थानिक दूचाकी वाहन चालकांसाठी ओळखपत्र देवून वाहन चालविण्याची परवानगी देण्यात यावी या बाबत पत्रामध्ये सुधारणा करण्याची विनंती शेकाप मार्फत करण्यात आलेली आहे. चालणाऱ्यांसाठी ओळखपत्र धारकांना वसाहतीचा वापर सकाळी सहा ते नऊ सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत करता येणार असल्याचे लेखी पत्र मुख्य प्रशासन व्यवस्थापक महेश पाटील यांनी दिले आहेत.