Ticker

6/recent/ticker-posts

दुधगाव मध्ये मोठ्या उत्साहात मोहरमची सांगता


     

दुधगांव वार्ताहर-निखिल नलवडे-

हसन - हुसेन यांनी सत्यासाठी व अन्यायाविरोधात दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून सर्वत्र पीर, ताबूत, पंजे बसविले जातात. दुधगाव मध्येही ऐतिहासिक मोहरम साजरा होतो. गावातील सर्वधर्मीय लोक एकत्र येवून परंपरागत कुदळ मारणे धार्मिक विधी करून मशीद, सुतार दर्गा व हजरत ख्वाजा हैदरसो दर्गा अशा तीन ठिकाणी पीर बसविले. मोहरम मध्ये संबंधित ठिकाणी विद्युत रोषणाई केली होती. मोहरमचा मुख्य दिवस म्हणजे खत्तलरात्र. यादिवशी गावातील लोक नैवेद्य घेऊन दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. खत्तलरात्री सर्व पीर एकत्र येऊन भेटी देतात व आपापल्या ठिकाणी परत गेल्या.मशिदितील मानाची मिरची सवारी, सुतार दर्गा, हजरत ख्वाजा हैदरसो दर्गा येथील पीर भक्तांच्या भेटीसाठी गावामध्ये जाते. रविवारी दप्पन दिवशी गावातील सर्व पीर एकत्र येवून भेटी घेतात. दप्पन दिवशी मुख्य चौकामध्ये सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात , अबिरांच्या उधळणीत,  पारंपरिक खेळ करत देवाचा पालखी मार्गातून विसर्जन मिरवणूक निघाली. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मोहरमवेळी दुधगावातील सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन धार्मिक रूढी परंपरेचे पालन करून, संवेदनशीलतेचा, बंधूभावाचा आणि सामुदायिकतेचा एक  दीपस्तंभ या सोहळ्यात अनुभवला. या सोहळ्यात शांतता, ऐक्य आणि श्रद्धा हीच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची ओळख आहे याचीही प्रचितीही दाखवली. दुधगावचा मोहरम हा फक्त गावासाठी नव्हे संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे. एकतेच्या पायावर उभी असलेली श्रद्धेची सुंदर शृंगारिक प्रतिमा आहे.

दुधगाव चा ऐतिहासिक मोहरम म्हणजे श्रद्धेचा, सलोख्याचा आणि संस्कृतीचा लोभस सोहळा आहे. अशा तऱ्हेने दुधगाव मध्ये ऐतिहासिक मोहरम उत्सवाची सांगता झाली.