Ticker

6/recent/ticker-posts

कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी



७ जुलै पासून होणार ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी


ग्रामीण प्रतिनिधी/प्रसाद दिनकरराव  : 

लोणावळ्याजवळील वेहेरगाव गडावर असलेल्या कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे शुक्रवारी एकवीरा देवस्थान ट्रस्टची मासिक बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे, एकविरा आईचे व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हि बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७जुलै पासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्ट प्रशासन यांनी दिली आहे. शुक्रवारी कार्ला येथे आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्थ मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोड संदर्भात हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मंडळ प्रशासनाकडून देण्यात आली

कार्ला येथील एकविरा आई हि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून राज्यासह देशातील अनेक ठिकाणाहून भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. मात्र काही भक्त अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात, त्यामुळे देवीचे व मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी विश्वस्थ मंडळाकडे आल्या असून अनेक भक्तांनी सोशल मिडयाद्वारे ड्रेस कोड संदर्भात मागणी केली केली होती. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्थ मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कार्ला एकवीरा आई मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे.

तसेच भक्तांशी वाद घालणाऱ्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना देखील काही सूचना दिल्या आहेत एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेतांना येथील कर्मचारी भक्तांवर आरडा ओरड करत असून भक्तांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी देखील विश्वस्थ मंडळाकडे आल्या असल्याने मंदिरातील कर्मचाऱ्यांनी देवी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून एकविरा आईच्या भक्तांनी देखील देवीचे दर्शन घेतांना मंदिरातील सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील ट्रस्टचे प्रमुख विश्वस्थ खासदार बाळ्या मामा यांनी देवी भक्तांना केले आहे


कसा असेल ड्रेसकोड

१. महिला व मुलींसाठी:

साडी, सलवार-कुर्ता, किंवा पारंपरिक भारतीय पोशाख असावा जेणेकरून पूर्ण अंग झाकलेले असावे.


२. पुरुष व मुलांसाठी:

धोतर, कुर्ता, पायजमा, पॅंट-शर्ट, टी-शर्ट घालावे जेणेकरून पूर्ण अंग झाकलेले असावे.


३. काय टाळावे:

शॉर्ट स्कर्ट, मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स, वेस्टर्न कपडे, हाफ पँट, व अंगप्रदर्शन करणारे कपडे