Ticker

6/recent/ticker-posts

अडचणींवर मात करत तळेगाव ढमढेरेच्या वृंदा तकटे बनल्या सनदी लेखापाल!



शिरुर ग्रामीण प्रतिनिधी - ( शैलेश जाधव)

“स्वप्न तेच पूर्ण होतात, जे पाहणाऱ्याला झोपवत नाहीत” या ओळी जणू तळेगाव ढमढेरे येथील वृंदा विकास तकटे यांच्या जीवनावरच खर्‍या उतरतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी, अभ्यास आणि अपार मेहनतीच्या जोरावर त्यांनी सीए (सनदी लेखापाल) फायनल परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करत गावाचा, शाळेचा आणि कुटुंबाचा अभिमान उंचावला आहे.

थांबल्या नाहीत, झुकल्या नाहीत, अखेर यश मिळवलं!

वृंदा तकटे यांचा सीए होण्याचा प्रवास खडतर होता. दोन वेळा अपयश आलं, तरी त्यांनी हार मानली नाही. तिसऱ्या प्रयत्नात फायनल परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी दाखवून दिलं की, संघर्ष कितीही मोठा असला तरी यशाला पर्याय नाही! परीक्षा काळात त्यांनी दररोज सकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सातत्याने अभ्यास केला.

अकादमिक यशामध्येही आघाडीवर

* इयत्ता १० वी - ९१% गुण

* इयत्ता १२ वी (वाणिज्य) - ८९% गुण

* पदवी शिक्षण - ७८% गुण

  शालेय शिक्षण रायकुमार बी. गुजर प्रशाळा, तळेगाव ढमढेरे येथे आणि पदवी शिक्षण साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात पूर्ण केले.

स्वप्न होतं आई-वडिलांचे, साकार केले वृंदाने!

“सीए व्हावं हे माझं आणि माझ्या आई-वडिलांचंही स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद शब्दांत मांडता येणार नाही. माझ्या यशाचे श्रेय माझ्या कुटुंबाला, गुरुजनांना आणि मित्रपरिवाराला देते. या प्रवासात अनेक वेळा डगमगले, पण खचले नाही. पुढेही प्रामाणिकपणे काम करत समाज व देशासाठी योगदान देईन,” असे वृंदा तकटे यांनी सांगितले.

गावात जल्लोष, कुटुंबीयांकडुन देखिल आनंदमय जल्लोष!

वृंदा तकटे यांच्या या यशानंतर तळेगाव ढमढेरेमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला आणि युवापिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण म्हणून गौरव केला.

                                                       विशेष उल्लेख

वृंदा तकटे यांचा संघर्ष व यश तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जिद्दीची ही कहाणी “यश मिळवायचं असेल, तर अपयशाशी मैत्री करावी लागते” हे पुन्हा सिद्ध करते.