प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील हवामानाने अजब चक्र दाखवत काही गावांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला, तर काही भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः पुंडा, बाबर्डा परिसरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला (पूर्व) मतदारसंघाचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. त्यांनी महसूल अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व पंचनामे पूर्ण करण्यास सांगितले आहे. जे शेतकरी यादीतून वंचित राहिले असतील त्यांचा देखील पंचनाम्यात समावेश करून मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार सावरकर म्हणाले, “शासन आपल्या पाठीशी ठाम उभं आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल.”दरम्यान, देवरी, आलेवाडी, पिंपरी, तरोडा, कवसा रेल या गावांमध्ये अद्याप दमदार पावसाचे आगमन न झाल्याने नागरिक चिंतेत आहेत. या भागांतील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.
शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Social Plugin