आलेवाडी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वाढीव ₹५०,००० अनुदानासाठी अनेक लाभार्थी सध्या प्रतीक्षेत आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री यांनी घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हा वाढीव निधी अजूनही अनेक ठिकाणी पोहोचलेला नाही.
आलेवाडी आणि परिसरातील घरकुल बांधकामे सध्या अंतिम टप्प्यात असून, निधीच्या अभावामुळे अनेक कामे अर्धवट राहिली आहेत. लाभार्थींनी कर्ज काढून अथवा स्वतःच्या बचतीतून कामे सुरू ठेवली असली, तरी आता पुढील कामासाठी निधीची गरज भासू लागली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेली ₹५०,०००ची वाढ अजूनही प्रत्यक्ष खात्यात जमा न झाल्याने ग्रामीण भागातील लाभार्थी नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आणि लाभार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे निधी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी केली आहे.
या योजनेत पारदर्शकता आणि वेळेत निधी वितरण होण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच ग्रामपंचायतींनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सरकारने घेतलेला निर्णय योग्य दिशेने असला तरी त्याची अंमलबजावणी वेळेत झाली नाही तर ग्रामीण लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Social Plugin