अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड-जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या धनगर पिंपरी गावाने शांतता आणि एकोपा टिकवण्यासाठी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.संपूर्ण गावाने एकत्र येऊन, कोणत्याही वादाला वाव न देता,'पोल चिठ्ठी' (Pool Chithya) या पद्धतीचा वापर करून तंटामुक्ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली आहे.या पद्धतीमुळे गावातील सामाजिक सलोखा आणि एकजूट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
या विशेष प्रक्रियेत सुनील भाऊ खांडेकर यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून,तर कृष्णा वरे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.ही निवड कोणत्याही मतभेदांशिवाय आणि अत्यंत शांततेत पार पडली.या अनोख्या निवडीमुळे गावातील सर्व नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक एकतेची भावना जपली.
यावेळी उपसरपंच विलासराव कचरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.ग्रामविकास अधिकारी रवींद्र ढवळे यांनी सचिव म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीमुळे होणारे वाद,मतभेद आणि मनभेद टाळून शांततेच्या मार्गाने विकास साधता येतो,हे धनगर पिंपरी गावाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे हे गाव जिल्ह्यासाठी नक्कीच एक प्रेरणास्थान बनले आहे.
Social Plugin