बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खातगुण (ता.खटाव) येथील वेदावती विद्यालयाच्या प्रांगणात टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. अगस्ती लावंड यांनी सामाजिक बांधिलकीपोटी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
खातगुणचे सुपुत्र व टार्गेट पब्लिकेशनचे संचालक अगस्ती लावंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच त्यांच्या अभ्यासासोबतच बौद्धिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने असे उपक्रम राबवत आहेत. येथील विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांचे व खाऊचे वाटप करण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. दरम्यान आपली भावी पिढी ही खऱ्या अर्थाने देशाचे भवितव्य आहे. आज ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्ध्यात थांबवावे लागत आहे. अशाच काही मुद्द्यांवर लक्ष देत टार्गेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वरचेवर सर्वोतोपरी मदत करण्याचा भविष्यात प्रयत्न असेल.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे माझ्यासाठी खूप मोठं समाधान असल्याचे मत अगस्ती लावंड यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख म्हणाल्या, समाजाप्रती आपण देणं लागतो या भावनेतून अगस्ती लावंड गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्याप्रती दानशूरपणा दाखवत आले आहेत. त्यांनी सातत्याने विविध शालापयोगी वस्तू भेट दिल्या तसेच वार्षिक परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष गुणवत्तावाढीचे शिबीर आयोजित करून विद्यार्थ्यांना अभ्यासात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची अभ्यासा सोबतच बौद्धिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यासाठीही सातत्याने विविध उपक्रम राबवत या मुलांचा शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ केला आहे. या मदतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्या उत्साहाने शिक्षण सुरू ठेवता येणार आहे.
कार्यक्रमाला सरपंच अमिना सय्यद, उपसरपंच आनंदराव लावंड, येरळा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णु शिंदे, शिक्षक वृंद व कर्मचारी,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin