Ticker

6/recent/ticker-posts

रोटरी क्लबकडून बोरगाव जुने प्राथ शाळेस संगणक संच भेट - - - - - - संगणकाचा शाळेत सदुपयोग व्हावा - प्रा.राजेंद्र.. बरकसे .




तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई 


   गेवराई , (बीड):-दि . २१ ऑगस्ट  गुरुवार जागतिक  पातळीवर समाजसेवेचा ठसा उमटविणाऱ्या रोटरी क्लब ३१३२ मार्फत प्राप्त झालेल्या  रोटरी क्लब गेवराईच्या वतीने तालुक्यातील जुने बोरगाव येथील दुर्गम भागात असलेल्या  जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेला संगणक संच नुकताच  प्रदान करण्यात आला .१९ ऑगस्ट २०२५ रोजी रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन संगणक सुरु करून दिला . यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर नलावडे, सदस्य प्रवीण जाधव पाटील, संदीप जाधव पाटील ,ग्राम पंचायत सदस्य एकनाथ लिंबोरे, शंकर जाधव पाटील, बाबासाहेब शिंदे ,मधुकर गायकवाड ,नवे बोरगाव येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागरे आदींच्या उपस्थितीत रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा .राजेंद्र बरकसे, सचिव प्रवीण जैन, क्लबचे व्होकेशनल सर्विसेसचे डायरेक्टर राजेंद्र डेंगे,क्लब प्रशिक्षक प्रशांत घोटणकर ,पब्लिक इमेज डायरेक्टर सुरेंद्र रुकर यांनी एकशिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशाताई बडे यांना संगणक संच शाळेसाठी प्रदान केला .सदर संच विद्यार्थ्यांसमोर  कार्यान्वित करण्यात  आला . यावेळी रोटरी क्लबच्या सदस्यांनी शाळेची पाहणी करून मुख्याध्यापिका बडे यांचे कौतुक केले . निसर्गरम्य वातावरण, बोलक्या भिंती , ॲक्टीव्ह  विद्यार्थी आणि त्यांना सहकार्य करणारे शालेय समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांना पाहून रोटरी क्लबचे प्रतिनिधी भारावून गेले होते. यावेळी उपस्थित रोटरी क्लब सदस्यांचे शाळेच्या वतीने शाळेच्या परसबागेतील फुलांचा गुच्छ  देऊन स्वागत करण्यात आले . 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे यांनी रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३२ चे तत्कालिन  प्रांतपाल डॉ. सुरेश साबू  आणि सहप्रांतपाल गणेश मुळे  यांच्या वतीने देण्यात आलेल्या  संगणकाचा उपयोग केवळ शाळेतील मुलांसाठी व शाळेसाठी होणे आवश्यक असून त्याचा विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपयोग व्हावा ,असा सल्ला दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई बडे यांनी सर्वांचे आभार मानून पं स गटशिक्षण कार्यालयाचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम पाटील यांच्या सूचनेवरून संगणक आमच्या शाळेला दिल्याबद्दल  रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले . रोटरी क्लबने वेळोवेळी समाजोपयोगी कार्य करत राहावे . जनता त्यांच्या पाठिशी राहील असे त्या म्हणाल्या . रोटरी क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थी व पोषण आहारच्या आशाताई गायकवाड यांच्याशी संवाद साधला .