*श्री सेवागिरी व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ*
बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेची, अपार श्रद्धेची आणि राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावणारी माणसे कमविली. त्यातूनच राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचं कठीण कार्य महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने करून दाखविले. जगातील कोणतेही राष्ट्र निष्ठा, त्याग आणि समर्पणातूनच बनत असत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले. सोमवारी पुसेगाव येथे प. पू. श्री हनुमानगिरी महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित ‘श्री सेवागिरी व्याख्यानमालेत’, ‘स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, उपसरपंच विशाल जाधव, ट्रस्टचे माजी पदाधिकारी, आदी मान्यवरांसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, महाराजांनी प्रत्येक शत्रुचा पराभव केला. त्यांच्या अद्वितीय शौर्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराज हे भारतीय आरमार दलाचे जनक असले तरी ते भारतीय मुद्रणकला, अनुकंपा तत्वावर भरती, पेन्शन योजना, दुर्बल घटकांना सरकारी मदत आदींचे निर्माणकर्ते आहेत. जोपर्यत महाराज जिवंत होते. तोपर्यंत औरंगजेब एकदा ही महाराष्ट्रात आला नव्हता. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके त्यांनी केलेल्या तेजस्वी कार्यामुळे दिसतील. प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
स्वराज्यात शेतकरी समाधानी व सुरक्षित होते. त्यांना कुठलेही अन्याय किंवा आर्थिक संकट नव्हते. म्हणूनच इतिहासात स्वराज्यात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. प्रत्येकाने शिवचरित्र वाचून त्यातील शिवरायांचे गुण घ्यावेत म्हणजे आयुष्यात कधीही अपयशाचे तोंड पाहावे लागणार नाही, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सुरेश जाधव यांनी केले. सुत्रसंचलन मोहनराव गुरव यांनी केले.
Social Plugin