Ticker

6/recent/ticker-posts

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात बेकायदेशीर “लकी ड्रॉ” आणि “गिफ्ट कुपन” योजनांविरोधात कारवाईची मागणी!



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा व ग्रामीण भागातील विविध व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवानगीविना “लकी ड्रॉ”,“गिफ्ट कुपन”,“स्पर्धा”,“गिफ्ट योजना” अशा विविध ऑफर्स जाहीर केल्या जात असून, या सर्व योजना बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे.या अनधिकृत व फसव्या योजनांविरोधात तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा जालना तर्फे करण्यात आली आहे.

ग्राहक पंचायतच्या तक्रारीनुसार,दिवाळी निमित्त अनेक ज्वेलर्स,मोबाईल विक्रेते,इलेक्ट्रॉनिक दुकाने, मॉल्स आणि इतर व्यापारी“सोने नाणे”,“बुलेट मोटरसायकल”,“स्मार्टफोन”,“गिफ्ट हॅम्पर”अशी आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन देत भ्रामक जाहिराती करत आहेत.मात्र या योजना जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मनोरंजन विभागाची पूर्वपरवानगी न घेता चालवल्या जात असल्यामुळे त्या बेकायदेशीर व फसवणुकीच्या स्वरूपाच्या आहेत.

                                    *ग्राहक पंचायतने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की*

1️⃣ Prize Chits and Money Circulation (Banning) Act,1978 च्या कलम ३ व ४ नुसार अशा “लकी ड्रॉ” किंवा “गिफ्ट कुपन” योजना प्रतिबंधित आहेत.

2️⃣ ग्राहक संरक्षण अधिनियम,२०१९ मधील कलम २(९) व २(२८) नुसार या योजना अन्याय्य व्यापार पद्धती (Unfair Trade Practice) व भ्रामक जाहिरात (Misleading Advertisement) यांत मोडतात.

3️⃣ बॉम्बे पोलीस अधिनियम,१९५९ च्या कलम १९० व ११२ नुसार जिल्हाधिकारीची परवानगी न घेता अशा सार्वजनिक बक्षीस योजना राबविणे दंडनीय अपराध आहे.

4️⃣ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३९७ व ३९८ नुसार अशा भ्रामक आश्वासनांमुळे ग्राहकांची फसवणूक होणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे आहे.

ग्राहक पंचायतने प्रशासनाला आवाहन केले आहे की, अशा बेकायदेशीर व फसव्या योजना राबविणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,जेणेकरून ग्राहकांचे हित जपले जाईल आणि प्रामाणिक व्यापार वातावरण निर्माण होईल.

या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत सदस्य ॲड.डी.पी.पाटील,जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे,जिल्हा संघटक बालाप्रसाद जेथलिया, ॲड.मधुकर सोनूने यांनी आव्हान केले आहे.