Ticker

6/recent/ticker-posts

सूर्यज्योत फाउंडेशनचे "जागर ‘स्व’ अस्तित्वाचा” युवक शिबिर उत्साहात संपन्न



प्रतिनिधी 

महाविद्यालय, दुसरबीड येथे सूर्यज्योत फाउंडेशनच्या वतीने “जागर ‘स्व’ अस्तित्वाचा” हे तीन दिवसीय युवक शिबिर २५ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या युवक-युवतींनी सहभाग नोंदवून स्व-ओळख, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी या संकल्पनांवर चिंतन केले.

शिबिराचे उद्घाटन नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “युवा शक्ती ही समाजपरिवर्तनाची प्रेरक शक्ती आहे. बदलासाठी तक्रारी नव्हे, तर कृती हवी. युवकांनी विचार आणि आचरणात प्रगल्भता आणली, तर समाज स्वतः बदल घडवतो.” त्यांनी सूर्यज्योत फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.

राजू केंद्रे (एकलव्य फाउंडेशन) यांनी ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रश्न उभा करत सांगितले की, “शिक्षण हे समतेचे सर्वात प्रभावी साधन आहे. शिक्षणाद्वारेच स्वाभिमान आणि आत्मनिर्भरता निर्माण होते.” त्यांनी युवकांना शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा दूत बनण्याचे आवाहन केले.

प्रा. तुषार हंसदास यांनी भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर सखोल भाष्य केले. “संविधान केवळ शासनाचा दस्तऐवज नाही; तो आपल्या अस्तित्वाचा पाया आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी युवकांना संविधानिक मूल्ये जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अविनाश भारती यांनी “स्वतःकडे पाहिलं की जग बदलतं” या विषयावर मंत्रमुग्ध करणारे भाषण केले. त्यांनी सांगितले, “आपण समाज बदलू इच्छितो, पण त्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला बदलणे. आपली विचारप्रक्रिया, आपला दृष्टिकोन, आपले आचरण—जेव्हा आपण स्वतः जागे होतो, तेव्हा जगही जागे होते.” त्यांनी कवितांच्या ओळींद्वारे युवकांमध्ये स्व-प्रेरणा जागवली. “ध्येय निश्चित करा, अपयशाला भीऊ नका; कारण अडचणी ही यशाच्या वाटेवरील पायऱ्या असतात,” असे सांगत त्यांनी तरुणांना आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्य या मूल्यांची जाण करून दिली. भारती यांनी वैयक्तिक जीवनातून समाजासाठी जबाबदारी घ्यावी, आत्मपरीक्षणातून परिवर्तन घडवावे, अशी प्रभावी हाक दिली. सभागृहात त्यांच्या प्रत्येक विचारावर टाळ्यांचा कडकडाट झाला. “स्व-परिवर्तन हीच समाजपरिवर्तनाची खरी सुरुवात आहे,” हा संदेश त्यांनी तरुणांच्या मनात दृढ केला.

या शिबिरात जागतिक पातळीवरील सर्पमित्र वनिता बोराडे यांनी “साप आणि पर्यावरण संवर्धन” या विषयावर माहितीपूर्ण सत्र घेतले. त्यांनी सर्पांविषयी असलेले गैरसमज दूर करत निसर्गाशी सुसंवाद राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “साप हे निसर्गाचे रक्षक आहेत; भीती नव्हे, समज आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

२०१९ साली प्रत्यक्ष कार्याला सुरू झालेल्या आणि २०२३ मध्ये स्थापन झालेले सूर्यज्योत फाउंडेशन हे श्री.बाबासाहेब सरकटे,आणि सौ. शितल सरकटे (खंदारे) यांच्या नेतृत्वाखाली व श्री.कृष्णा पंधे, आनंद आघाव व इतर सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनात संस्था सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण विषयक उपक्रम सातत्याने राबवत आहे. या संस्थेने आतापर्यंत “उजेड ज्ञानाचा” मोहीमेद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, “आरोग्य ते आध्यात्म” अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे, “जागर 'स्व' अस्तित्वाचा ” उपक्रमाद्वारे युवकांमध्ये सामाजिक सलोखा व व्यक्तिमत्व विकास, तसेच वंचित विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य आणि करिअर मार्गदर्शन असे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. संस्थेचा मूलमंत्र आहे “स्वतः बदलून समाज बदला.” या तत्वज्ञानावर आधारितच ‘जागर स्व-अस्तित्वाचा’ हे शिबिर उभे राहिले आहे.

शिबिराच्या आयोजनामागे विकास खंदारे, मारोती पवार, नैतिक धोंगडे, प्रशांत महाजन, श्रद्धा तांगडे, धनंजय गोतमारे, आकाश हिवाळे, विकी जाधव, दर्शना तिजारे, पल्लवी पाटील, जगन जाधव, शरद नागरे, तेजस अग्रवाल आणि करण धोंगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

समारोप प्रसंगी लोकजागर संस्थेचे विश्वस्त प्रवीण गीते, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण, पत्रकार देवानंद सानप, प्रा. दिलीप नाईकवाड, शेख युनूस, प्रा. म्हस्के, बद्रीनारायण बाहेती, भास्कर खुळे,ऋषिकेश देशमुख यांच्यासह सर्व शिबिरार्थी उपस्थित होते.

या शिबिरातून युवकांनी स्व-प्रेरणा, आत्मचिंतन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश आत्मसात केला. “मी समाजाचा बदल घडवू शकतो” ही भावना त्यांनी कृतीत उतरवण्याचा संकल्प केला. सूर्यज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ आता केवळ शिबिरापुरती मर्यादित राहिली नाही, तर युवकांच्या मनात स्व-ओळख, समता आणि समाजपरिवर्तनाची ठिणगी पेटवणारी नवी दिशा ठरली आहे.