अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
घनसावंगी तालुक्यातील मौजे भेंडाळा तांडा (शिवार) येथील शेतकऱ्यांना सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सहन करावे लागले.शासनाच्या नियमानुसार अतिवृष्टी अनुदान मिळणे आवश्यक असताना संबंधित यादी अद्याप ऑनलाइन पोर्टलवर अपलोड न झाल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
या संदर्भात भेंडाळा तांडा येथील सर्व शेतकरी बांधिताच्या वतीने तहसीलदार,घनसावंगी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,ग्राम महसूल अधिकारी यांनी सुमारे दिड महिन्यांपूर्वी अतिवृष्टी अनुदान २०२५ ची यादी तहसील कार्यालयात सादर केली होती.
सदर यादीवर संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची स्वाक्षरीही झाल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र,सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत भेंडाळा तांडा येथील अतिवृष्टी अनुदानाची यादी ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही.त्यामुळे एकाही शेतकरी बाधितास अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.
अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून पुढील हंगामासाठी लागणारे बियाणे,खत व इतर शेती साहित्य खरेदी करणे कठीण झाले आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात तात्काळ लक्ष घालून भेंडाळा तांडा (शिवार) येथील अतिवृष्टी अनुदान २०२५ ची यादी त्वरित पोर्टलवर अपलोड करून शासन नियमांनुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वितरित करण्यात यावे,अशी ठाम मागणी शेतकरी बाधितांकडून घनसावंगी तहसीलदार यांच्या कडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे..





Social Plugin