गौरव ब्राम्हणवाडे (@ ग्रामीण प्रतिनिधी )
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्या युरिया खताची तीव्र कमतरता निर्माण झाली असून, त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. पिकांची वाढीची अत्यंत महत्त्वाची अवस्था असताना युरिया खत वेळेवर न मिळाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील विविध कृषी केंद्रांमध्ये शेतकरी युरिया खतासाठी वारंवार येत असले तरी खत उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती वाढली आहे. यासोबतच काही ठिकाणी युरिया खत देताना इतर खत किंवा औषधे जबरदस्तीने खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले जात असल्याच्या (लिंकिंग) तक्रारीही पुढे येत आहेत.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे (नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर) यांनी संबंधित कृषी प्रशासनाकडे निवेदन सादर करून तालुक्यात तात्काळ युरिया खताचा पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच युरिया खतासोबत अन्य खत किंवा औषधे घेण्याची सक्ती (लिंकिंग) त्वरित थांबवावी, अशी स्पष्ट मागणीही करण्यात आली आहे.
वेळीच योग्य कार्यवाही न झाल्यास शेतकरी वर्गाकडून तीव्र आंदोलन व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
उपस्थित पदाधिकारी - विक्की भगत, विजय सोनोने, सुरज उर्फ बबन सोनोने, मुकेश ठवकर





Social Plugin