बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ, मांजरवाडी परिसरात रविवारी सायंकाळी बिबट्याच्या जोडीचा वावर दिसून आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकरी, शेतमजूर, प्रवासी आणि नागरिकांना बिबट्यांच्या दर्शनाने दैनंदिन कामे करणे मुश्किल झाले आहे. खटाव तालुका वनविभागाला मात्र याबाबत सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत काहीच माहित नव्हते.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता मांजरवाडी येथील मस्कोबा मंदिर परिसरातील शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या आढळून आला. अर्जुन भंडलकर यांनी बिबट्या शिवारातून फिरतानाचा व्हिडिओही चित्रित केला आहे. जनावरे चारायला घेऊन गेलेल्या गुराख्यांची तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांची बिबट्याच्या अस्तित्वामुळे घाबरगुंडी उडाली. बिबट्या आल्याचे समजताच सर्व शेतकऱ्यांनी जनावरांसह घर गाठले. रात्रभर जनावरे सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली. काही शेतकरी आणि तरुणांनी रात्र जागून काढत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. सोमवारी सकाळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वनविभागाने त्वरित हालचाली करुन बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
वनविभागानेही बिबट्याच असल्याची केली खात्री
वनविभागाने मोळ, मांजरवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खात्री केली आहे. रविवारी या भागात बिबट्याच होता आणि तो कोरेगाव वनक्षेत्र किंवा गारवडी भागातून आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना कोरेगाव तालुक्यात तसेच गारवडी डोंगर भागात घडल्या आहेत. वनविभागाने पेट्रोलिंग टीम पाठवून या भागात जनजागृती सुरु केली असल्याची माहिती तालुका वनक्षेत्रपाल आटपाडकर यांनी दिली.





Social Plugin