भेंडा बु // ग्रामीण प्रतिनिधी दि.10 फेब्रुवारी 2026 :
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस हवालदार विष्णू त्रिंबक भागवत यांना त्यांच्या उत्कृष्ट, धाडसी व कौशल्यपूर्ण कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित विशेष गौरव समारंभात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पोलीस हवालदार विष्णू भागवत हे अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांनी अल्पावधीतच गुन्हे उघडकीस आणण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे दाखल गुन्हा क्रमांक ६७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) अंतर्गत दाखल गुन्ह्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या गुन्ह्यात आरोपींनी ड्रायव्हर व क्लिनर यांना चाकू व धारदार शस्त्राने धमकावून जिवे मारण्याची भीती घालत मोठ्या प्रमाणावर चोरी केली होती. आरोपींनी सुमारे ९ लाख ६७ हजार २०० रुपये किमतीचे ९५३ कट्टे जबरीने चोरून नेले होते. ही घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस दलासाठी मोठे आव्हान बनली होती.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध
या गुन्ह्याचा तपास करताना पोहेकॉ. विष्णू भागवत यांनी तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विशेष पथक तयार करून मध्यप्रदेशातील शिवपुरी व मुरैना जिल्ह्यात छापे टाकण्यात आले.
तपासात आरोपी
१) अर्जुनसिंग नारायणसिंग सरदार (वय ४१ वर्षे),
२) सागर सिंग गुरुदास सिंग सरदार (वय ४४ वर्षे),
३) कल्ला शब्बीर कोहरी (वय २५ वर्षे),
४) रतीलाल मदनलाल कोहरी (वय ४० वर्षे)
यांना अटक करण्यात आली.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे ३५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या संपूर्ण तपास प्रक्रियेत पोहेकॉ. विष्णू भागवत यांनी अत्यंत जबाबदारीने आणि धाडसाने कामगिरी बजावली.
पोलीस दलाकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
त्यांच्या या उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रशस्तीपत्र पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन व प्रशिक्षण व खास पथक) कृष्ण प्रकाश यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले.
गौरव समारंभाच्या वेळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी पोहेकॉ. विष्णू भागवत यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
समाजातून अभिनंदनाचा वर्षाव
पो. हे.कॉ. विष्णू भागवत यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल, सहकारी पोलीस कर्मचारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होण्यास मदत झाली असून गुन्हेगारीवर आळा बसण्यास पोलीस दलाला मोठे बळ मिळाले आहे.

.jpg)




Social Plugin