Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक शहरात उष्णतेची झळ वाढली; कमाल तापमान ३२.८ अंशांवर.



नाशिक, प्रतिनिधी ,अमन शेख ,

नाशिक। दि. १५ फेब्रुवारी २०२६: शहर व उपनगरांमध्ये मागील चार दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून, कमाल तापमानाचा पारा सलग पाचव्या दिवशी ३२ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला गेला आहे. शनिवारी (दि. १४) कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर सलग चार दिवसांत दुसऱ्यांदा तापमान ३३ अंशांच्या उंबरठ्याजवळ गेले.

दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. सायंकाळी काही प्रमाणात गारवा जाणवला असला, तरी वातावरणातील उष्णतेची तीव्रता कायम असल्याचे चित्र होते.

दरम्यान, कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ नोंदवली जात आहे. शनिवारी सकाळी किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस इतके होते. रात्री जाणवणारा गारठा कमी होत असून, उकाड्याची चाहूल नागरिकांना लागली आहे. दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.