छायाचित्र - पुसेगाव = कला व वाणिज्य महाविद्यालयात खासदार 'शरद पवार यांचे राष्ट्रबांधणीतील योगदान' या एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेमध्ये बीज भाषण करताना प्राचार्य आनंद मेणसे,व्यासपीठावर कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के,प्राचार्य डॉ.सुनील हेळकर मा.के.के.घाटगे,माजी प्राचार्य डॉ.के.एम.नलवडे, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, डॉ.विजय चोरमोरे, डाॅ.एन.डी लोखंडे, डॉ.ए.एस. जगताप,डॉ.दत्तात्रय काळेल छाया -प्रकाश राजेघाटगे बुध
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिले . राजकारणात आपले विचार आणि आदर्श हे वेगळे ठेवून देशातील जनतेच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.
पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात ' शरद पवार यांचे राष्ट्रबांधणीतील योगदान ' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित कार्यक्रम प्रसंगी बीजभाषण केले.व्यासपीठावर डॉ.ज्ञानदेव म्हस्के कुलगुरू,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य के.के घाटगे,रयत माजी प्राचार्य डॉ.के.एम.नलवडे, रयत शिक्षण संस्थेचे,आजीव सभासद प्रा.डॉ.संजय क्षीरसागर,डॉ.विजय चोरमारे,प्रा.डॉ.एन.डी.लोखंडे,प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात प्राचार्य मेणसे म्हणाले,'शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वावर सत्यशोधक चळवळीच्या विचारसरणीचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो.तसेच त्यांनी विद्यार्थी जीवनातच विचारपूर्वक काँग्रेस चळवळीची निवड केली, ज्यातून त्यांच्या राजकीय प्रवासाची दिशा निश्चित झाली.घरातील डाव्या विचारांच्या वातावरणामुळे सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक बनली.
बारामती मतदारसंघातून राजकारणाची सुरुवात करताना त्यांनी केवळ मतदारसंघाचा विकास न करता कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक जडणघडण केली.व कार्यकर्त्यांना स्पष्ट विचारधारा दिली.नेतृत्व हे केवळ पद नसून जबाबदारी आहे, याची जाणीव करून दिली.त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी, सहकार , शिक्षण, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन,औद्योगिक क्षेत्रांची सांगड घालत विकासाचे नवे मॉडेल उभे केले.ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कार्यकर्त्या समवेत सहभाग घेतला. दुष्काळ परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे धोरण राबविले. फळबाग योजना,रोजगार हमी योजना आणि ग्रामीण विकास उपक्रमांत त्यांनी सक्रिय भूमिका बजाविली.महात्मा गांधी यांच्या ग्रामविकास विचारांची अंमलबजावणी करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली. किल्लारी भूकंपानंतर पुनर्वसनाच्या कामात त्यांनी घेतलेली भूमिका आजही आदर्श मानली जाते.
केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या कृषी धोरणात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आणि कृषी उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी देशात विविध कृषी योजना राबविल्या. परदेशातून होणाऱ्या अन्नधान्य आयातीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत.स्वदेशी उत्पादनाला चालना दिली.संरक्षण क्षेत्रातील खर्चात कपात करून तो निधी कृषी,सहकार ,आणि शिक्षण क्षेत्राकडे वळविण्याचा त्यांनी मांडलेला विचार दूरदर्शी असल्याचे नमूद केले.शरद पवार यांचे योगदान केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही.तर देशातील क्रीडा,साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण काम केले आहे.कबड्डी, खो-खो यांसारख्या ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देऊन त्यांनी स्थानिक क्रीडा संस्कृती जपली.विविध साहित्यिक उपक्रमांना पाठिंबा देत सांस्कृतिक विकासालाही चालना दिली.देशातील औद्योगिक विकासाचे धोरण राबविताना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना पर्यावरणपूरक धोरणे आणि ग्रामीण भागातील ऊर्जा विकास यावर त्यांनी भर दिला.
ग्रामीण भागातील सहकारी साखर कारखाने, सहकारी विकास सोसायटी यासारख्या संस्था सक्षमपणे चालाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले चांगला कार्यकर्ता बनण्यासाठी विचारांवर निष्ठा ठेवणे अत्यावश्यक आहे. शरद पवार यांचे जीवन हे याच तत्त्वाचे उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये राजकीय जाणीव वाढण्यास मदत झाली असून, राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली,असे मत व्यक्त केले.चर्चासत्राच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा व्यापक आढावा घेतला. खासदार शरद पवार यांनी देशाच्या प्रगतीमध्ये संरक्षण क्षेत्रात काम करत असताना देशाच्या सुरक्षितते सोबत राष्ट्र उभारणीची भक्कम पायाभरणी केली.समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी स्त्रियांसाठी आरक्षण संकल्पनेला पाठबळ दिले.तसेच सैन्यांमध्ये महिलांना संधी उपलब्ध करून देण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले. यावेळी त्यांनी नमूद केले की, शरद पवार यांनी देशातील वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि पुरोगामी विचारसरणी जोपासत समाजाला नवीन दिशा दिली. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना शिक्षणाला नवा दृष्टिकोन दिला.
आधुनिक काळाची गरज ओळखून ए.आय.तंत्रज्ञानाची जोड देत शिक्षण अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला.कृषी क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम करताना शरद पवार यांनी कृषी खात्यामार्फत नवनवीन संकल्पना रुजविल्या .दुग्ध उत्पादन, संकलन,वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच सहकार क्षेत्र,ऊस,शेती, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. तसेच त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत समाजात प्रगतशील विचार रुजविले आणि राष्ट्र बांधणीसाठी सर्वसामावेशक दृष्टिकोन दिला. त्यांच्या कार्यामुळे देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्षेत्रामध्ये मोठा बदल घडून आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शरद पवारांचे राष्ट्रबांधणीतील योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची उपस्थितांना आवाहन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रस्ताविकांमधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर यांनी खासदार शरद पवार यांच्यावर लहानपणापासून आई शारदाबाई पवार यांचे संस्कार,देशातील कृषी, सहकार ,क्रीडा ,संरक्षण,आपत्ती व्यवस्थापन इ.क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. याविषयी चर्चासत्राची भूमिका मांडली. सूत्रसंचालन प्रा.एस.आर.धोंगडे यांनी केले. तर आभार प्रा.डाॅ.आर.पी.भोसले यांनी मानले. चर्चासत्रासाठी विविध विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.





Social Plugin