Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन दौंडमधील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

 


पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

दौंड: तालुका दौंड येथील विविध शासकीय कार्यालये आणि दौंड नगरपरिषदेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन वेळेचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाने सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी वेळ निर्धारित केलेली असतानाही, अनेक कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त होत आहेत. काही अधिकारी तर स्वतःला लोकप्रतिनिधी समजून शासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले असून, या बेजबाबदारपणामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत आहेत.

​हा प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांचे आणि शासन परिपत्रकांचे स्पष्ट उल्लंघन आहे. 'शासन' ही संकल्पना धोरणात्मक असली तरी तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेने करणे बंधनकारक असते. मात्र, दौंडमध्ये यंत्रणेच्या या निष्काळजीपणामुळे सामान्य जनतेला वेळेवर सेवा मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित प्राधिकरणाने सर्व कार्यालयांच्या बायोमेट्रिक आणि हजेरी पटाची कसून तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, जे कर्मचारी कामाच्या वेळेत गैरहजर आढळतील, त्यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

​प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक न करता आपली जबाबदारी स्वीकारावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. जर या परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर या प्रकरणाचा पाठपुरावा उच्च स्तरावरील कायदेशीर संस्थांकडे केला जाईल, असा इशारा पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता अमर मधुकर जोगदंड यांनी दिला आहे. नागरिकांनीही अशा गैरप्रकारांविरुद्ध पुराव्यानिशी तक्रारी दाखल करून प्रशासनाला शिस्त लावण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.