बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र मूळ गावी कटगुण (ता. खटाव) येथील महात्मा फुले स्मारक परिसरात अत्यंत अभिमानाने व भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया महेश शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी बोलताना डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, “महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून समानतेचा दीप प्रज्वलित केला. कटगुण येथील हे स्मारक त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थान असून, या स्मारकाचा विकास व संवर्धन करून पुढील पिढ्यांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.” त्यांनी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समतेच्या दिशेने जिल्हा परिषद स्तरावर अधिक प्रभावी काम करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस भरत मुळे ,कृषी व पशुसंवर्धन सभापती लता कर्णे, पंचायत समिती उपसभापती रेश्मा शेडगे, पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन, भाजप तालुका अध्यक्ष शिवाजी दादा शेडगे, अंकुश गोरे, भारती गोरे,सरपंच नवनाथ वलेकर तसेच संबंधित अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मारक परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा जागर करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.





Social Plugin