प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर, दि. 06 मे 2026 प्रतिनिधी
गट ग्रामपंचायत सिद्धनाथपूर येथे गेल्या दोन वर्षांपासून अंडरग्राउंड सांडपाण्याची पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः असह्य झाले आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावामुळे आठ ते दहा कुटुंबांना विविध आजारांनी ग्रासल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे लेखी तक्रारी दिल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना सांडपाणी व पावसाचे पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात लहान मुले व वृद्ध नागरिक राहत असून सतत आजारपणाचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
या समस्येबाबत सिद्धनाथपूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अमरावती येथे धाव घेतली होती. त्यानंतर तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर यांनी संबंधित विभागाला तातडीने सांडपाण्याची व पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
“साचलेल्या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला असून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांना या घाणीच्या साम्राज्यातून तात्काळ मुक्त करावे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, दि. 15 मे 2026 पर्यंत सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास सिद्धनाथपूर येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा पत्राद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.





Social Plugin