११ मे २०२६
पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर
पालघर जिल्ह्यातील व येथील तलाठी कार्यालयांमध्ये अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, सकाळी कार्यालयीन वेळ सुरू झाल्यानंतरही संबंधित तलाठी उशिरा कार्यालयात येतात. त्यामुळे रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, ७/१२ उतारा, फेरफार, वारस नोंद, जात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे तसेच इतर महत्त्वाची शासकीय कामे तासन्तास प्रलंबित राहतात. दूरवरून येणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा दिवसभर प्रतीक्षा करूनही काम न झाल्याने निराश होऊन परत जावे लागत आहे.
विशेष म्हणजे, काही नागरिक सकाळपासून कार्यालयाबाहेर थांबून असतानाही संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी रोजंदारी सोडून शासकीय कामासाठी कार्यालयात येत असल्याचे सांगितले. मात्र अधिकारी वेळेवर न आल्याने त्यांचा पूर्ण दिवस वाया जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, तलाठी कार्यालय हे महसूल विभागाचे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असून नागरिकांच्या दैनंदिन कामांशी थेट संबंधित आहे. मात्र अशा प्रकारे अधिकारी उशिरा येत असल्याने शासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही वेळा कार्यालयात कर्मचारी उपस्थित असले तरी अधिकृत कामासाठी संबंधित तलाठी आवश्यक असल्याने नागरिकांची कामे रखडून राहत असल्याचेही समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचा आरोप केला आहे. कार्यालयात वेळेवर अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांचा संताप वाढत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नागरिकांनी “सरकारी कार्यालये वेळेवर सुरू होत नसतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल उपस्थित केला आहे.
सोमवारी दुपारी काढण्यात आलेल्या एका छायाचित्रात कार्यालयात नागरिक उपस्थित असताना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयीन वेळेचे पालन न झाल्यास शासकीय सेवा देण्याच्या प्रक्रियेत मोठा विलंब होतो व त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांवर होत आहे.
काही नागरिकांनी असा आरोपही केला आहे की, अनेक वेळा कार्यालयात आल्यावर “साहेब बाहेर गेले आहेत”, “थोड्या वेळात येतील” किंवा “उद्या या” अशी उत्तरे देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागत असून त्यांच्या वेळेसोबत पैशांचाही मोठा अपव्यय होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतूक खर्च करून कार्यालयात यावे लागते, मात्र काम न झाल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.
महसूल विभाग हा नागरिकांच्या मूलभूत कागदपत्रांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शासनाची प्रतिमा खराब होत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसील प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित तलाठ्यांच्या उपस्थितीची चौकशी करावी, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली काटेकोरपणे लागू करावी आणि नियमित तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी व तहसील प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, कार्यालये नियमित वेळेत सुरू राहावीत आणि सामान्य लोकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.





Social Plugin