मन्सूर शहा. धोत्रा. भ.( महाराष्ट्र ग्रामीण न्युज.)

बुलढाणा, दि. २९ मे (जिमाका) : राज्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याचे आदेश दि. २५ मे २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले असून हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच संबंधित अद्यावत नियम, परिपत्रके व आदेशांचा विचार करून प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती आणि निवडणूक प्रक्रिया दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कालमर्यादेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण प्रक्रियेत तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा सहभाग राहणार असून, सर्व तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन आरक्षण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त ग्रामसेवकांना प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेस सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.

सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

• विशेष ग्रामसभेची सूचना देणे – ०८ जून २०२६

• विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढणे – १२ जून २०२६

• प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – १७ जून २०२६

• प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करणे – १९ जून २०२६

• हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – १९ जून ते २५ जून २०२६

• प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय – ०३ जुलै २०२६

• अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – ०८ जुलै २०२६

• अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध करणे – १० जुलै २०२६

राज्यातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्या आरक्षण कार्यक्रमाची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.