बुध दि[ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव, माण आणि फलटण तालुक्यासाठी प्रस्तावित असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय फलटणऐवजी पुसेगाव येथे मंजूर करण्यात यावे, अशी आक्रमक आणि न्याय्य मागणी पुसेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकअभिजित (गणेश) जाधव यांनी केली आहे. पुसेगाव हे तिन्ही तालुक्यांच्या केंद्रस्थानी (मध्यवर्ती ठिकाणी) असल्याने हाच पर्याय सर्वसामान्य जनतेसाठी सोयीचा आणि न्याय देणारा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अभिजित जाधव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, फलटण येथे कार्यालय झाल्यास माण-खटावच्या दुर्गम भागातील जनतेवर मोठा प्रशासकीय अन्याय होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
प्रशासकीय कार्यालयासाठी पुसेगावच योग्य का?
संचालक अभिजित जाधव यांनी पुसेगावच्या बाजूने खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:
भौगोलिक केंद्रस्थान पुसेगाव हे खटाव, माण आणि फलटण या तिन्ही तालुक्यांच्या अगदी मध्यभागात वसलेले आहे. तिन्ही तालुक्यांतील कोणत्याही गावावरून पुसेगावला येणे अधिक सोपे, सुटसुटीत आणि कमी अंतराचे आहे.वेळ आणि पैशांची बचत फलटणला जाण्यापेक्षा पुसेगावला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाल्यास सामान्य जनतेचा प्रवासाचा वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
माण आणि खटाव हे दोन्ही तालुके सातत्याने दुष्काळाशी दोन हात करत असतात. येथील जनतेला हक्काचे शासकीय कार्यालय अगदी जवळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
दुष्काळाशी लढणाऱ्या जनतेला प्रशासकीय अन्यायाशी लढायला लावू नका
> "माण आणि खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गावांतून फलटणला जाणे म्हणजे सर्वसामान्यांवर अन्यायकारक अंतर लादण्यासारखे आहे. आयुष्यभर दुष्काळाशी लढणाऱ्या आमच्या गरीब जनतेला आता प्रशासनाने आपल्या हक्कासाठी प्रशासकीय अन्यायाशी लढायला लावू नये. प्रशासनाने केवळ एका बाजूचा विचार न करता तातडीने निर्णय बदलावा."--अभिजित (गणेश) जाधव(संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती)
पुसेगाव हाच न्याय'
प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, केवळ भौगोलिक परिस्थिती आणि लोकभावना विचारात घेऊन हे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय पुसेगाव येथेच मंजूर करावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. "पुसेगाव हाच न्याय आहे,"असा निर्धार व्यक्त करत जाधव यांनी प्रशासनाला यावर गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे.





Social Plugin