Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोलीचे आदर्श मुख्याध्यापक डॉ प्रकाश अंभोरे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार



प्रतिनिधी : प्रा डॉ विजय गायकवाड

हिंगोली : शिक्षण, समाजसेवा, संशोधन, साहित्य, विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व बहुआयामी योगदान देणारे भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा हिंगोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सखाराम अंभोरे यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ जून रोजी सामाजिक न्याय सभागृह, बुलढाणा येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. निरुत्तीभाऊ राजेजाधव यांनी केले होते.

पुरस्कार प्रदान करताना आयोजकांनी नमूद केले की, डॉ. प्रकाश अंभोरे यांनी शिक्षण क्षेत्राला केवळ व्यवसाय न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून स्वीकारले असून, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी, संशोधन, साहित्य, विज्ञान, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या दिशादर्शक व प्रेरणादायी योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येत आहे.

या यशाबद्दल त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. संजय देवडे (खंडेलवाल कॉलेज, अकोला), भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. मदन मार्डीकर, सचिव ॲड. गयबाराव नाईक, संचालक ॲड. केशवराव शिरसाट व पंडितराव बांगर, उपमुख्याध्यापक अनिल लोळेवार, पर्यवेक्षक भारत शिंदे, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सुरेशराव वानखेडे, डॉ. मदनराव मुसळे, चंद्रकांत कल्याणकर, डॉ. गणेशराव अंभोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक, सामाजिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

डॉ. प्रकाश अंभोरे यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे हिंगोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.