Ticker

6/recent/ticker-posts

वर्धनगडचे भूमिपुत्र अन् वर्धनी माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र कारखानीस यांचे निधन; वर्धनगड व पंचक्रोशीवर शोककळा



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे] 

श्री वर्धनी माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, देवीचे निस्सीम भक्त आणि लोकसंग्रही नेतृत्व नरेंद्र कारखानीस यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने वर्धनगड आणि संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

स्वातंत्र्यसैनिक, कॉम्रेड तथा वर्धनगडचे माजी सरपंच स्व. रामचंद्र कारखानीस यांचे नरेंद्र कारखानीस हे चिरंजीव होत. वडिलांचा राजकीय, सामाजिक आणि पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे चालवला.

राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत नरेंद्र कारखानीस यांच्या स्पष्ट आणि कणखर आवाजाचा मोठा धबधबा होता. असे असले तरी, प्रत्यक्षात मात्र त्यांचा स्वभाव अतिशय शांत, संयमी आणि दुसऱ्यांचे ऐकून घेणारा होता. लहान मुले, महिला, युवती आणि सर्वसामान्य ग्रामस्थ यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी व आदराची भावना होती.

सार्वजनिक आणि सामाजिक कामांमध्ये नेहमी अग्रभागी राहून निस्वार्थपणे धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव होता. गावातील किंवा परिसरातील कोणत्याही व्यक्तीने कसलेही काम सांगितले, तरी ते टाळणे किंवा 'नाही' म्हणणे त्यांच्या स्वभावात नव्हते. प्रत्येकाच्या मदतीला खंबीरपणे धावून जाणाऱ्या या सर्वांगसुंदर आणि तगड्या कार्यकर्त्याच्या जाण्याने, परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातीलच एक आधारवड गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

 वर्धनी मातेच्या चरणी त्यांची अपार श्रद्धा होती. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मंदिराचा विकास, धार्मिक उत्सव आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सदैव तत्पर राहून काम केले. वर्धनी मातेच्या सेवेत अहर्निश धडपडणारा एक निस्सीम भक्त काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसर शोकाकुल झाला आहे.

त्यांच्या पश्चात मोठा मित्रपरिवार आणि शोकाकुल आप्तेष्ट असा परिवार आहे.

स्व.नरेंद्र कारखानीस यांच्या पार्थिवावर  दुपारी ४:०० वाजता वर्धनगड स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.