बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील मौजे रणशिंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी इमारतीचे कुलूप तोडून ७० हजार रुपये किमतीचे दोन एल.ईडी. टीव्ही चोरणाऱ्या आरोपीला पुसेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास रणशिंगवाडी येथील अंगणवाडी इमारतीचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने तेथून ₹४०,०००/- किमतीचा ४३ इंचाचा (आय.मी. कंपनी) आणि ₹३०,०००/- किमतीचा ३२ इंचाचा (ए.जी.ई. कंपनी) स्मार्ट एल.ईडी. टीव्ही असा एकूण ७० हजार रुपयांचा माल चोरून नेला. याशिवाय जिल्हा परिषद शाळेतील मुतारीचे पाण्याचे नळ तोडून व खिडकीतून वर्गात प्रवेश करून शैक्षणिक साहित्याचे नुकसान केले होते. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत दशरथ गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. नागनाथ खुणे यांनी तातडीने तपासाची चक्रे हलवली. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हा गुन्हा रणशिंगवाडी गावातीलच निखिल शामराव मसगुडे (वय २५ वर्षे) याने केल्याचे निष्पन्न झाले. पुसेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी निखिल मसगुडे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही एल.ईडी. टीव्ही जप्त केले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी (कोरेगाव) श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपासात स.पो.नि. नागनाथ खुणे, पोलीस अंमलदार योगेश बागल, नेहा कोळेकर, यशोदा मोरे, रेश्मा भोसले, ज्ञानेश्वर जाधव, अविनाश घाडगे, राहुल जाधव, दयाबा नरळे, शंकर सुतार, उमेश देशमुख, मेघा जगताप तसेच रणशिंगवाडी गावचे पोलीस पोलीस पाटील सुनील रणसिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे व मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.





Social Plugin