Ticker

6/recent/ticker-posts

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संच मान्यतेच्या प्रश्नासाठी शिक्षण मंत्री यांच्या सोबत तातडीने बैठक लावणार: पालकमंत्री ना.शंभूराज देसाई


बुध  दि [प्रकाश राजेघाटगे  ] 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संच मान्यतेच्या प्रश्नाबाबत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्याचे शिक्षणमंत्री यांच्या सोबत तातडीने विशेष बैठक लावणार असून त्या बैठकीस आपण स्वतः उपस्थित राहून शिक्षकांच्या समस्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री ना शंभुराज देसाई यांनी दिले.

        दौलतनगर मरळी (पाटण)येथे झालेल्या जनता दरबार कार्यक्रमात  पालकमंत्री ना शंभुराज देसाई यांना सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास खंडाईत, सचिव प्रा. गोविंद वाघ , प्रा. सुनील शिंदे, प्रा. हणमंत मांडके, प्रा. केदार होगले, प्रा . पंकज बोबडे, प्रा. सुनील पाटील , प्रा . दिलीप माने, प्रा. सिद्ध आव्हाडप्रा गणेश विधाते प्रा विक्रांत पाटील, प्रा पगार यांच्यासह अनेक शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.

 दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या शिक्षक संच मान्यतेचे निकष शिक्षण खात्याने बदलले आहेत. त्यामुळे राज्यात सुमारे १० ते १२ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. तात्पुरत्या सेवेतील शिक्षक तसेच शिक्षण सेवक यांच्या सेवा समाप्त होणार असून काही कायम शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.या सुधारित निकषांमध्ये संच मान्यतेसाठी तुकडीमध्ये विद्यार्थी संख्या वाढवणे, ग्रामीण - डोंगराळ - आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या तसेच मुलींच्या शैक्षणिक सोयीसाठी तुकडी मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्येची दिलेली सूट नाकारणे, तासिकेचा कालावधी ४५  मिनिटांवरून ४० मिनिटांवर आणणे, शास्त्र शाखेच्या प्रॅक्टिकल बॅचेस मधील विद्यार्थी संख्या २० वरून ३० वर नेणे, शिक्षक पात्रता धारक असूनही त्यांना एकत्रितपणे दोन विषयांचा कार्यभार न देणे इत्यादी अनेक सुधारित घातक निकष अवलंबण्यात येणार आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व शिक्षकांची संख्या २५ ते ३० टक्के कमी करणारे हे घातक निकष अमलात येऊ नयेत यासाठी राज्य शिक्षक महासंघाने वारंवार  शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. शिक्षकांची राज्यभर आंदोलनेही चालू आहेत तथापि याबाबत कोणताही अनुकूल निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत शिक्षण मंत्री यांच्याशी एकदाही चर्चा होऊ न शकल्याने राज्यभरातील शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे. पालकमंत्री यांनी व्यक्तीशः  लक्ष घालावे, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांचे हित राखले जाईल यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करावेत अशी मागणी सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली.