डॉ. भूषण पोतदार यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांची पुनर्वसनाची मागणी

नांदगाव खंडेश्वर,प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

 दि. ५ ऑगस्ट : दि. ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती व ढगफुटीसदृश पावसामुळे मंगरूळ चव्हाळा येथील प्रभाग क्र. ४ तसेच धामक गावात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. भविष्यात अशा आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने दोन्ही गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात डॉ. भूषण पोतदार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मा. तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर यांच्यामार्फत मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मंगरूळ चव्हाळा येथील प्रभाग क्र. ४ हा साखळी धरणाच्या संभाव्य धोक्याच्या क्षेत्रात येत असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. तसेच धामक गावही वारंवार अतिवृष्टी व पूरस्थितीचा सामना करत असल्याने या गावाचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक आहे.

यावेळी दोन्ही गावांचे तातडीने सर्वेक्षण करून सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, पुनर्वसनासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून सर्व मूलभूत सुविधांनी युक्त वसाहत उभारावी, आपत्तीग्रस्त कुटुंबांना शासन नियमानुसार आर्थिक मदत व घरकुलाचा लाभ द्यावा, तसेच पूरप्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पुनर्वसनास प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

निवेदन सादर करताना डॉ. भूषण पोतदार, अविनाश ब्राह्मणवाडे, राहुल उडबगले, संदीप अंभोरे, विजय तांबडे, संतोष जामकर, भूषण तीरुमारे, सादिक शहा, अमोल बनकर, यासीन शहा, रवींद्र बेलसरे, पुंड पटले, हर्षद चौधरी, मंगेश तीरमारे, जावेद पठाण, सुनील नागरीकर, विनेश बेलसरे, गणेश ढबाले, आर्यन बनकर, रमेश मसराम, वैशाली गावंडे, संजय नागरीकर, मारुती ढवळे, विनोद गाढवे, सचिन बदबूचे, राजीक शहा, अंकित तीरमारे, वैभव अतकरी, सुधाकर तीरमारे, रोशन अतकरी, रोहित मसराम, रुपेश गाढवे, शुभम गावंडे, शेख शकील, शिवम ब्राह्मणवाडे, अंकित सोनगडे, अभिषेक पवार यांच्यासह दोन्ही गावांतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.