उद्घाटन सोहळा
कळंबोली प्रतिनिधी : श्री.अवधुत साळुंखे कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरातील मुख्य चौकात रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर वाचनालयाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक श्री. रामदास शेवाळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
स्टील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, वाहनचालक आणि वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी कार्यरत असतात. दिवसभराच्या धावपळीच्या जीवनात त्यांना काही क्षण विश्रांती घेता यावी, तसेच वाचनाची आवड जोपासता यावी, या उद्देशाने या वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे.
या वाचनालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिक, व्यावसायिक आणि कामगार वर्गाला वाचनासाठी तसेच विश्रांतीसाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. सदर वाचनालय सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून, या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.
यावेळी वाचनालयाच्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी श्री. कुमारशेठ बोडके, उपाध्यक्षपदी श्री. शफीक शेख, खजिनदारपदी श्री. राजू शेख यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून श्री. दत्ताशेठ कोकरे आणि श्री. अजय सरगर यांची निवड करण्यात आली.
रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमामुळे स्टील मार्केट परिसरातील नागरिक, व्यावसायिक आणि कामगार वर्गाला वाचनाची व विश्रांतीची सुविधा उपलब्ध झाली असून, हा उपक्रम समाजोपयोगी ठरणार आहे.





Social Plugin