Ticker

6/recent/ticker-posts

कमी पाऊस, कडक ऊन; सोयाबीन काढणीची शेतकऱ्यांची लगबग!

 

बुध  :परिसरात कमी पाऊस आणि कडक उन्हामुळे सोयाबीनच्या शेंगा जागेवरच फुटू लागल्याने पीक वाचविण्यासाठी पहाटेपासून काढणीची लगबग सुरू आहे.



मजुरांचे दर गगनाला; पहाटेपासून शेतात राबराब

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे]

  एल निनोचा संभाव्य प्रभाव, पावसाची ओढ आणि वाढत्या उष्णतेमुळे यंदा सोयाबीन पीक अपेक्षेपेक्षा लवकर काढणीला आले आहे. कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असतानाच, कडक उन्हामुळे शेंगा जागेवरच फुटू लागल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सोयाबीन वेळेत काढून पदरात पडावे, यासाठी शेतकरी पहाटे सहा वाजल्यापासूनच मजुरांसह शेतात उतरले आहेत. मात्र, मजुरांची टंचाई आणि वाढलेले मजुरीचे दर यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

        यंदाच्या खरिपात पावसाने पुरेशी साथ न दिल्याने सोयाबीन पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. जेमतेम पावसावर तग धरलेल्या पिकाची काढणी सुरू झाली असली, तरी वाढत्या तापमानामुळे सोयाबीनच्या शेंगा वाळून फुटू लागल्या आहेत. त्यामुळे शेंगांतील दाणे जमिनीवर पडून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. वेळेत काढणी झाली नाही, तर हाती आलेले थोडेफार उत्पादनही वाया जाण्याची शक्यता आहे.

मजुरांसाठी शेतकऱ्यांची धावपळ

       सोयाबीन काढणीसाठी सकाळी सहा ते नऊ या अवघ्या तीन तासांसाठी सुमारे ३०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. तर एकरी काढणीसाठी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. मजुरांची उपलब्धता कमी आणि मागणी अधिक असल्याने मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. मजुरीचे वाढलेले दर आणि कमी उत्पादन यांचा मेळ घालताना शेतकऱ्यांची आर्थिक कसरत सुरू आहे.

      काही शेतकरी महिला एकमेकींच्या शेतात पैऱ्याने म्हणजे परस्परांच्या मदतीने सोयाबीन काढणीचे काम करत आहेत. मजुरीचा खर्च टाळण्यासाठी आणि वेळेत पीक घरात आणण्यासाठी परस्पर सहकार्याचा हा मार्ग स्वीकारला जात आहे.

दुष्काळाच्या सावटात आर्थिक नियोजनाचे आव्हान

       एका बाजूला कमी पाऊस, दुसऱ्या बाजूला कडक ऊन आणि त्यात वाढलेला काढणीचा खर्च, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. सोयाबीन विक्रीतून मिळणारे उत्पन्न किती असेल, याची शाश्वती नसताना कुटुंबाच्या गरजा भागविणे, शेतीचा खर्च भरून काढणे आणि पुढील हंगामासाठी तरतूद करणे, अशी अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी आहेत.

           पुढील काळात पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता लक्षात घेता सध्या हातात येणाऱ्या उत्पन्नाचे नियोजन करण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे खरिपातील उरलेसुरले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत.