मन्सूर शहा.:---चिखली, दि. १७ ऑक्टोबर २०२६ :
श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मनीषा सपकाळ यांनी दारिद्र्याची संकल्पना, त्यामागील कारणे, सामाजिक व आर्थिक परिणाम तसेच दारिद्र्य निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक सुरक्षा यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, समाज आणि नागरिकांनी समन्वयाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी एस. पी. एम. महाविद्यालय, चिखली येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. दिलीप महाजन, आदित्य मुक्कलवार आणि प्रा. होगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात महाविद्यालयातील कु. वैभवी मोरगंजे, कु. वैष्णवी झाल्टे, कु. गर्जना कोकणे आणि कु. आदिती देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी दारिद्र्याची समस्या, तिचे समाजावर होणारे परिणाम आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी समाजाची जबाबदारी यांविषयी विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. सुनिता कलाखे यांनी जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिनाचे महत्त्व स्पष्ट करून दारिद्र्याच्या समस्येविषयी व्यापक जनजागृती करण्याची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील ४४ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये दारिद्र्याच्या समस्येविषयी संवेदनशीलता व जागरूकता निर्माण झाली.
सूत्रसंचालन डॉ. सुनिता कलाखे तर आभार रोहन देव्हारे यांनी मानले.





Social Plugin