• २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम • लाचेची मागणी झाल्यास १०६४ क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन!!
मन्सूर शहा महाराष्ट्र ग्रामीण न्युज धोत्रा. भं.
बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : शासकीय कामकाजात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व वाढवून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन निर्माण करण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा घटकाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह–२०२६ साजरा करण्यात येणार आहे. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच शहरी व ग्रामीण भागात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचविणे, नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि शासकीय सेवांमध्ये प्रामाणिकपणा व पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती, शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने व चर्चासत्रे, तसेच सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर आणि हँडबिलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरोधी संदेश दिला जाणार आहे.
सोशल मीडिया, पथनाट्यांतून जनजागृती : दक्षता सप्ताहादरम्यान व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांसह आकाशवाणी व डिजिटल जाहिरातींचा वापर करून जनजागृती करण्यात येणार आहे. स्थानिक लोककलावंतांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर करून भ्रष्टाचारविरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही भ्रष्टाचारविरोधी कायदेशीर उपाययोजना, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराविरोधी दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विविध घटकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लाचेची मागणी झाल्यास त्वरित संपर्क साधा : शासकीय सेवा मिळविण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता किंवा लाच देण्यास प्रवृत्त न होता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी करून नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येते. तक्रारदारांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूक राहणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असून, नागरिकांच्या सहभागातूनच पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून प्रामाणिकपणा, नैतिकता आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
तक्रारीसाठी संपर्क : लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९४०५०९१०६४ यावर संपर्क साधावा. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा कार्यालयाच्या ०७२६२–२४२५४८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dyspacbbuldhana@mahapolice.gov.in आणि acbbuldana@gmail.com या ई-मेल पत्त्यांवर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी विभागाच्या www.acb.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा घटकाच्या वतीने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात सजग राहून दक्षता जनजागृती सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधिक्षक भागोजी चोरमले यांनी केले आहे.
.jpg)




Social Plugin