Ticker

6/recent/ticker-posts

‘पुस्तक वाचा आणि बक्षीस जिंका!’ अमृतवेल मीडिया समूहाचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम.

 


हनुमान विद्यालय, निढळ येथे पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेचा शुभारंभ

पुसेगाव दि [प्रतिनिधी ] विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी मैत्री वाढावी आणि वाचनातून ज्ञानसमृद्ध व्यक्तिमत्त्व घडावे, या उद्देशाने अमृतवेल मीडिया समूहाच्या सौजन्याने हनुमान विद्यालय, निढळ येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री. चंद्रकांत दळवी साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमृतवेल मीडिया समूहाचे संपादक माननीय श्री. धर्मेंद्र पवार आणि आयकर विभागाचे आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, पालक तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काटकर सर यांनी प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी वेदांतिका पाटोळे हिने वाचनाचे महत्त्व विशद केले, तर इयत्ता नववीतील विद्यार्थिनी श्रेया साळुंखे हिने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे श्री. धर्मेंद्र पवार यांनी पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेची रूपरेषा स्पष्ट केली. ‘पुस्तक वाचा आणि बक्षीस मिळवा’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये नियमित वाचनाची सवय निर्माण करणे, वाचलेल्या साहित्याचे आकलन करण्याची क्षमता विकसित करणे आणि त्यांना पुस्तकांच्या विश्वाशी जोडणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयकर विभागाचे आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन केले. स्वतः डॉक्टर असूनही शासकीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयकर विभागात आयुक्तपदापर्यंत पोहोचल्याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी नियमित अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची सवय लहानपणापासून जोपासणे आवश्यक आहे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि आकलनक्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. चंद्रकांत दळवी साहेब यांनी विद्यार्थ्यांना वाचन कसे करावे, वाचलेल्या साहित्याचा विचार कसा करावा आणि त्यातून ज्ञान कसे आत्मसात करावे, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी जोपासण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देशमुख पी. एस. आय. आणि सौ. तुपे पी. व्ही. मॅडम यांनी केले, तर सौ. धंगेकर आर. व्ही. मॅडम यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आणि त्यांना ज्ञानाच्या नव्या वाटा खुल्या करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.