देऊळगाव राजा (प्रतिनिधी) मनोहर खंदारे
दिनांक १८
देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख व साहित्यिक प्रा. मधुकर जाधव यांना साहित्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उमरद, ता. सिंदखेड राजा येथे प्रभाकर वखरे आणि ग्राम पंचायतीच्या वतीने आयोजित शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंती उत्सवात प्रा. जाधव यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा म. रा. नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर बिडवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरदच्या सरपंच सौ. निर्मला पंढरीनाथ उबाळे होत्या.
प्रा. मधुकर जाधव हे सातत्याने लेखन करीत असतात. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित असून एक अभ्यासक्रमात तर दुसरे शासनमान्य ग्रंथ यादीत समाविष्ट आहे. विविध साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून ते सहभागी असतात तसेच प्रबोधनपर व्याख्याते म्हणून देखील त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या एकूण साहित्य सेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात सदाशिव ढोलेकर यांचे व्याख्यान देखील संपन्न झाले. परिसरातील वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, आध्यात्मिक, देशसेवा, शौर्य, गायन कला आणि उत्कृष्ट व्याख्याते अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. मधुकर जाधव यांच्या या यशाबद्दल श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि साहित्यस्नेही गोतावळ्याने त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा. मधुकर जाधव यांची प्रतिक्रिया
(आपल्याच गावाने दिलेला सन्मान हा मनाला विशेष आनंद आणि समाधान देणारा असतो. आपल्या माणसांनी आपल्या कार्याची घेतलेली दखल हीच खरी प्रेरणा असते. ‘साहित्य सेवा पुरस्कार’ हा माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून, माझ्या साहित्यप्रवासाला गावाने दिलेली प्रेमाची पावती आहे. हा सन्मान माझ्या गावाला आणि माझ्या साहित्यप्रेमी वाचकांना समर्पित करतो.)





Social Plugin