Ticker

6/recent/ticker-posts

श्री संभाजी राजे विद्यालय इसरुळच्या जिजाऊंच्या लेकींची शालेय तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरावर झेप!

 



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

कु. भक्ती कत्ते व कु. कल्याणी चाळगे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या यशाचे सर्वत्र कौतुक

इसरुळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती तसेच अमरावती जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या सहकार्याने शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन दि. ११ ते १३ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण भागातील श्री संभाजी राजे विद्यालय, इसरुळ येथील जिजाऊंच्या लेकींनी सहभाग नोंदवत आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. ग्रामीण भागात राहूनही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर क्रीडाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न या विद्यार्थिनींनी केला आहे.

वयोगट १७ वर्षांखालील खेळाडू :

१. कु. पूनम प्रताप भुतेकर

२. कु. अक्षरा गजानन भुतेकर

३. कु. पूनम हनुमान कोलते

वयोगट १९ वर्षांखालील खेळाडू :

१. कु. भक्ती विठ्ठल कत्ते

२. कु. कल्याणी शंकर चाळगे

या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कु. भक्ती विठ्ठल कत्ते व कु. कल्याणी शंकर चाळगे यांची शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयासह इसरुळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील मुलीही क्रीडाक्षेत्रात राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. नितीन जेऊघाले सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालक यांचेही या विद्यार्थिनींच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी सभापती अशोकराव पडघान, माजी प्राचार्य पी. एस. वायळ तसेच इतर मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जिजाऊंच्या लेकींची ही क्रीडाक्षेत्रातील भरारी अशीच उंचावत राहो आणि त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करावे, हीच सदिच्छा!

— श्री संभाजी राजे विद्यालय, इसरुळ परिवाराच्या वतीने खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!